Views


*सालेगाव येथे पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा निर्घृण खुन, अज्ञात आरोपीविरोधात लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
 लोहारा तालुक्यातील सालेगाव येथे पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्याचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खुन केल्याची घटना दि.3 एप्रिल 2021 रोजी उघडकीस आली. या प्रकरणी लोहारा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, गोविंद व्यंकट करदोरे (वय 42) असे मयताचे नाव आहे. गोविंद करदोरे यांना तीन एकर शेती आहे. शेतात कांद्याची लागवड केली आहे. शेतीसाठी रात्री वीजपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे मयत गोविंद हे आपल्या आईसोबत कांद्याला पाणी देण्यासाठी शुक्रवारी रात्री मुक्कामासाठी शेतात गेले होते. कांद्याला पाणी देत असताना मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तीने गोविंद यांच्या डोक्यात घातक हत्याराने वार करून जखमी केले. यात ते जागीच मृत्यू झाला. गोविंद यांच्या आई रुक्मिणी करदोरे यांनी पहाटे साडे पाच वाजायच्या सुमारास गोविंद यांना पाहण्यासाठी विहिरीकडे आल्या असता त्यांना मुलगा गोविंद यांचा मृतदेह विहिरीजवळ दिसुन आला. त्यांनी आरडाओरड केल्याने सालेगावातील ग्रामस्थांनी धाव घेतली असता हा खुनाचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ उस्मानाबादचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे, तुळजापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे, लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण फौजफाट्यासह आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर उस्मानाबाद येथील श्वान पथकास पाचारण केले. परंतु बराच परिसर श्वान पथकाने पिंजूनही कोणताही धागेदोरा पोलिसांच्या हाती लागला नाही. यामुळे पोलिसांनी विविध बाबी समोर ठेवून तपासास सुरुवात केली. याप्रकरणी मयत गोविंद करदोरे यांच्या आई रुक्मिणी करदोरे यांच्या फिर्यादीवरून लोहारा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण करीत आहेत.
 
Top