Views


*पानवाडी येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास  
घेऊन आत्महत्या*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

उस्मानाबाद तालुक्यातील पानवाडी येथील तरुण शेतकरी विनायक उर्फ पिंटू लक्ष्मण डक (वय, 40) यांनी बुधवार दि, 6 जानेवारी 2020 रोजी कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी मयताच्या वडिलांनी दिलेल्या खबरीवरून ढोकी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. विनायक डक यांच्यावर पंजाब national बँक, आयसीआयसीआय बँकेचे कर्ज होते. मोहतरवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आदी बँकेचे कर्ज होते. तसेच खाजगी सावकारांचे कर्ज होते, आयसीआयसीआय बँकेचे कर्ज 2 लाखाच्या पुढे असल्याने कर्जमाफीत बसले नव्हते. पंजाब बँकेने पीककर्ज भरुन घेतले पण त्यांना अन्य बँकेचे बोजे असल्याने कर्ज नाकारले होते. वडील माजीसैनिक लक्ष्मण डक व आई यांनी नातवांच्या शिक्षनासाठी उस्मानाबाद शहरात भाड्याने घर घेऊन राहत होते. यंदा कोरोनामुळे शाळा बंद असल्याने त्यांनी भाड्याचे घर खाली करून पानवाडी येथे राहण्यासाठी गेले होते. मुलगा विनायक कर्जबाजारी झाल्याने त्याचे कर्ज टप्याटप्याने भरण्याचा निर्णय वडिलांनी घेतला होता. त्यानुसार पंजाब बँक, आयसीआयसीआय बँकेचे काही कर्ज भरले होते. सोनेतारण कर्ज घेऊन काही रक्कम उभारली होती. त्यांना कर्जमाफी मिळाली नव्हती, त्यामुळे ते कर्ज कसे फेडायचे याच्या सतत चिंतेत होते. सप्टेंबर 2020 मध्ये त्यांनी कोथिंबीर पीक घेतले होते. कणगरा येथील गुंड आडनावाच्या व्यापाऱ्यांने 1 लाख 5 हजारात कोथिंबीर घेतली होती, त्याने 55 हजार रोख दिले पण 50 हजार दिले नाहीत. याची लेखी तक्रार विनायक डक यांनी पोलीस ठाण्यात दिली होती. परत एकदा विनायकने कोथिंबीर पीक घेतले पण चांगला भाव न मिळाल्याने पीक उपटून बांधावर फेकून दिले होते. संकटावर संकटे येत गेल्याने अखेर विनायकने परिस्थितीपुढे हार पत्करून जीवन संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतला आणि बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. विनायकची पत्नी भाग्यश्री या मोहतरवाडी- पानवाडी ग्रुप ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य होत्या. आता ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक सुरू असून विनायकने तो आर्थिक संकटात असल्याने निवडणूकित सक्रिय नव्हता. त्यांच्या मागे आई, माजीसैनिक वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, 3 विवाहित बहिणी असा परिवार आहे.
डक कुटुंबावर संकटावर संकटे
विनायकचे वडील माजीसैनिक लक्ष्मण नरहरी डक हे मुळ डकवाडी तालुका उस्मानाबाद येथील रहिवासी आहेत. पानवाडी ही सासुरवाडी असून ते पानवाडी येथे स्थायिक झाले आहेत. त्यांना तीन मुली व विनायक मुलगा अशी एकूण 4 अपत्ये आहेत. दोन जावई यांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. एकुलता एक मुलगा विनायकचाही काल आकस्मिक मृत्यू झाला. लक्ष्मण डक यांच्यावर उतारवयात नातवंडे व सून, परिवार सांभाळण्याची वेळ आली आहे.
 
Top