Views


*प्रत्येक मतदान केंद्रावरील पायाभूत सोयी सुविधांची पाहणी करावी - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडून क्षेत्रीय अधिकाऱ्यांना मतपेटी हाताळण्याचे प्रशिक्षण* 

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

05 औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात 72 मतदान केंद्र व दोन सहकारी मतदान केंद्र असे एकूण 74 मतदान केंद्र असून या सर्व मतदान केंद्रावर 33 हजार 67 पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तरी  सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक मतदान केंद्रावर जाऊन मतदान केंद्रावर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार किमान पायाभूत सोयी सुविधांची पाहणी करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात (दि.6 नोव्हें.) आयोजित पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या प्रशिक्षण कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी दिवेगावकर बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, नायब तहसीलदार चेतन पाटील, नायब तहसीलदार पंकज मंदाडे  यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार व सर्व् क्षेत्रिय अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी दिवेगावकर पुढे म्हणाले, औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान होणार आहे. मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार क्षेत्रीय अधिकारी यांचा प्रशिक्षण कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. सर्व अधिकाऱ्यांनी हे प्रशिक्षण समजून घ्यावे व प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. मतपेटी हाताळणे बाबत काही अडचणी असतील तर या प्रशिक्षणात त्याचे निराकरण करण्यात येईल. त्यामुळे या अनुषंगाने कोणालाही कोणत्याही प्रकारचे प्रश्न अथवा अडचणी असतील तर त्या येथे मांडाव्यात असेही त्यांनी सूचित केले. या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात निर्माण करण्यात आलेल्या सर्व मतदान केंद्रावर सर्व संबंधित  अधिकाऱ्यांनी जाऊन मतदान केंद्राची पाहणी करावी. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रावर किमान पायाभूत सुविधा असल्याची खात्री करावी. तसेच मतदान केंद्र हे मुख्यालयापासून किती अंतरावर असून त्या मतदान केंद्रावर जाण्यास रस्ते कसे आहेत याबाबतची ही पाहणी करावी व आवश्यक असेल त्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी दिल्या. सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात पदवीधर निवडणूक तिच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे व आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन होईल याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी असेही निर्देश श्री. दिवेगावकर यांनी दिले. या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी स्वतः सर्व क्षेत्रीय अधिकारी यांना मतपेटी हाताळणी व मतपेटी सिलिंग बाबत प्रशिक्षण दिले. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पदवीधर मतदार संघासाठी मतपेटीच्या माध्यमातून मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्या अनुषंगाने सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना मतपेटी हाताळणी व सिलिंग बाबतचे प्रशिक्षण निवडणूक प्रशासनाच्या वतीने आज देण्यात येत असल्याचे सांगून सर्व संबंधितांनी हे प्रशिक्षण अत्यंत दक्षपणे घ्यावे असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने  करण्यात आले.

 
Top