Views




*लोहारा शहरासह तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा शहरासह तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. दि.14 ऑक्टोबर 2020 रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बहुतांश नदींना पूर आला आहे. दरम्यान, शहरालगत असलेला साठवण तलाव ओव्हरफ्लो झाल्याने साडव्याचे पाणी शेतात शिरले. त्यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तब्बल तीस वर्षानंतर प्रथमच मोठा पाऊस झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील सहा दिवसापासून परतीच्या पावसाने तालुक्यात हजेरी लावली आहे. मात्र दोन दिवसापासून पावसाचा चांगलाच जोर वाढला आहे. बुधवारी पहाटेपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस दुपारी एकपर्यंत होता.  मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. बहुतांश नद्यांना पूर आला आहे. शहरा जवळील भदभदी नदीला पूर आल्याने उमरगाकडे जाणारा राज्यमार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तर माकणी ते सास्तूर मार्गावरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने काही काळ वाहतूबंद होती.  सद्या सोयाबीन काढणीची लगबग सुरू असतानाचा पावसाने झोडपल्याने सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर बहुतांश उसाचे फड जमीनदोस्त झाली आहेत. शिवाय पाण्याच्या प्रवाहामुळे शेतातील बांधबंधारे फुटले आहेत. अनेकांची शेती पाण्याखाली गेली आहे. दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणारा मोघा तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहे. सांडव्याचे पाणी अनेकांच्या शेतात घुसले आहे. शेतातून पाणी जात असताना जनू नदी दुथडी भरून वाहत आल्यासारखी स्थिती होती. या सांडव्याच्या पाण्यामुळे शेकडो हेक्टर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.  
--------------------------------------------------
 शहर व तालुका झाला जलमय
शहरात रात्रीपासून पावसास सुरवात झाली. पहाटेच्या सुमारास सुरू झालेला मुसळधार पाऊस दुपारपर्यंत होता. त्यामुळे शहरातील बहुतांश भाग जलमय झाला. पावसाचे पाणी घरात घुसल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. घरात पाणी आल्याने संसारोपयोगी साहित्यासह अन्नधान्याची नासाडी होवून नुकसान झाले आहे. महादेव मंदिर परिसर, जट्टे प्लॉटींग, चाटे गल्ली हा भाग जलमय झाला होता. तीस वर्षानंतर सर्वात मोठा पाऊस झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
--------------------------------------------------
 या मुसळधार पावसामुळे लोहारा तालुक्यातील वडगाव गांजा येथील गोरख बाबुराव बेळे यांच्या शेतातील 4 एक्कर वरील ऊस मुळासकट वाहून गेले, अनेक घरामध्ये पाणी शिरले, त्यामध्ये यादव खंडा हांडे, ज्ञानेश्वर किसन कुंभार, मारुती लोहार यांचे घरे ढासळून जमीनदोस्त झाली. दयानंद गायकवाड, भागवत दणाने, आप्पाराव गायकवाड, विष्णू गायकवाड, विकास आतकरे, कुंडलिक आतकरे यांच्या घरामध्ये पाणी शिरले. लोहारा शहरासह तालुक्यात शासनाने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यातून व नागरिकांतून होत आहे.

 
Top