Views


*डॉ.दिग्गज दापके-देशमुख यांच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे शेकडो हातांना मिळाली नोकरीची संधी* 

*‘कुलस्वामीनी’ आणि ‘सह्याद्री’ची उस्मानाबादसह औरंगाबाद जिल्ह्यात गगनभरारी; शेकडो जणांना मिळाली नोकरी!*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

‘हवा पाणी अन् तुळजाभवानी’ एवढ्यापुरतीच उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख मर्यादित आहे. सततची दुष्काळी स्थिती, डोंगराळ भागामुळे पीकपाणी जेमतेम. परिणामी खेड्यातून शहराकडे येणार्‍यांची संख्या वाढली. पण उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुक्याची ठिकाणे ही नावालाच शहरे म्हणावी अशी परिस्थिती आहे. त्यामुळे रोजगारासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातून मुंबई-पुण्याकडे जाणार्‍यांची संख्या मोठी आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपल्या भूमिपुत्रांना आपल्याच मातीत रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे अत्यंत महत्वाचे आहे. परंतु बोलण्यापेक्षा कृतीवर भर देणारे डॉ.दिग्गज दापके-देशमुख यांच्या प्रयत्नांना यश येऊन अनेकांना आपल्याच भागात नोकरीची संधी मिळाली आहे. विविध संस्थांची उभारणी करुन  रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्याच्या प्रयत्नात त्यांनी उचललेल्या खारीच्या वाट्यामुळे सद्यस्थितीत तीनशेच्या वर कुटुंबांना आधार मिळाला आहे. उच्चविद्याविभूषित असलेले डॉ.दिग्गज दापके-देशमुख हे बालरोग तज्ज्ञ असले तरी सामाजिक कार्याचे बाळकडू त्यांना कुटुंबातूनच मिळालेले आहे. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी सांभाळत असतानाच आपल्या भागाच्या हितासाठी काहीतरी करण्याची सुप्त इच्छा कायम होती.  त्यातूनच कुलस्वामीनी शिक्षण प्रसारक संस्था आणि सह्याद्री परिवाराची मुहुर्तमेढ त्यांनी रोवली. त्यांच्या या कार्याला वडील सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.रमेश दापके - देशमुख, मातोश्री शकुंतलादेवी दापके-देशमुख, सुविद्य पत्नी तथा प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वसुधा-दिग्गज दापके-देशमुख तसेच बंधू हर्षद व मित्रमंडळींचे वेळोवेळी सहकार्य लाभले. आज सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स, सह्याद्री ब्लड बँक, सह्याद्री मेडिकल्स, शैक्षणिक कार्यात अग्रेसर असलेली कुलस्वामिनी शिक्षण प्रसारक संस्था, बेरोजगार, व्यापारी, गरजूंना आर्थिक मदतीचा हात देऊन संकटात योग्य दिशादर्शन करणारी दिशा नागरी सहकारी पतसंस्था, तसेच सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल, बालकांना त्यांचे हक्क मिळवून देणारी चाईल्ड लाईन, सामाजिक कार्यात नावलौकीकपात्र ठरलेले सह्याद्री फाऊंडेशन्स, वाहतूक क्षेत्रातील सह्याद्री कार्गो अशा वेगवेगळ्या संकुलांमधून तब्बल तीनशेहून अधिक सुशिक्षित युवक युवतींना  नोकरी उपलब्ध झाली आहे. तसेच शैक्षणिक संकुल आणि रुग्णालयाशी निगडीत व्यवसायांना देखील चालना मिळाल्यामुळे अनेकांना अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत, हे वेगळेच. आपल्याच भागात नोकरी, व्यवसाय मिळाल्यामुळे कुटुंबापासून दूर जाण्याची अथवा कुटुंबासह रोजगारासाठी मुंबई, पुण्याला जाण्याची या कुटुंबांवरील वेळ टळली आहे. त्याचबरोबर औरंगाबाद येथेही संस्था कार्याचा विस्तार त्यांनी मोठ्या कौशल्याने केला असून येथेही अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. औरंगाबादेत सध्या कुलस्वामीनी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नर्सिंग कॉलेज, नर्सिंग स्कुल, महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय, सेव्हन वंडर्स प्री-स्कुल या शिक्षक संकुलांनी शैक्षणिक क्षेत्रात लौकीक वाढविला आहे. या संकुलाच्या माध्यमातूनही अनेकांना नोकरी मिळाली आहे.  उस्मानाबाद आणि औरंगाबाद येथील संस्थांच्या कार्याचा विस्तार अल्पावधीतच वाढवून शैक्षणिक, आरोग्य व सामाजिक क्षेत्रात केलेले भरीव कार्य आणि त्यांची उमेद वाखाणण्याजोगी आहे. कोणतीही गोष्ट साध्य करणे तसे सोपे अजिबात नाही. परंतु जेव्हा तुम्ही समाजहिताचे कार्य हाती घेता तेव्हा कितीही अडचणी आल्या तरी त्यात यश मिळतेच. मानवकल्याणाच्या भावनेने एखादे काम करत असाल तर तुमच्यासोबत हजारो जणांचे आशीर्वाद कायम राहतात. डॉ. दापके-देशमुख यांचा नेहमीच गुणवत्तापूर्ण कार्यावर भर राहिलेला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या संस्थांचा विस्तार मोठ्या वेगाने होत असला तरी गुणवत्तेला बाधा पोहचणार नाही, याची दक्षता त्यांनी वेळोवेळी घेतलेली आहे. म्हणूनच सर्व आरोग्य क्षेत्र असो वा शैक्षणिक, दोन्ही क्षेत्रात त्यांनी केलेली सुरुवातच गुणवत्तापूर्ण असल्याने त्यांनी निर्मिलेल्या संस्था, संकुले भक्कमपणे उभी आहेत. परंतु यासाठी त्यांनी अहोरात्र घेतलेल्या परिश्रमाला तोड नाही. यांचे वैद्यकीय, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात मोठे योगदान तर आहेच. परंतु त्यांच्या या कार्याचा बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठीही मोठा उपयोग झाला आहे, हे नाकारता येणार नाही. त्याचबरोबर एवढ्यावरच न थांबता संस्थांच्या विस्ताराबरोबर आणखी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा मानस डॉ. दिग्गज दापके-देशमुख बोलून दाखवतात. त्यांचा कार्यविस्तार अधिक वृद्धिंगत होवो, हीच सदिच्छा..
 
Top