Views


*कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प हा मराठवाड्यातील अवर्षण प्रवण व कायम दुष्काळी भागातील शेती सिंचन आणि पिण्याच्या पाणी प्रश्नी अत्यंत महत्वाकांक्षी व जिव्हाळ्याचा असून हा प्रकल्प पूर्ण होण्यास आता आणखी विलंब होऊ नये याकरिता मा. राज्यपाल महोदयांनी  तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत, अशा  मागणीचे निवेदन भाजपा प्रदेश सरचिटणीसआ.सुजितसिंह ठाकूर यांनी राज्यपालांना दिले*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प हा मराठवाड्यातील अवर्षण प्रवण व कायम दुष्काळी भागातील शेती सिंचन आणि पिण्याच्या पाणी प्रश्नी अत्यंत महत्वाकांक्षी व जिव्हाळ्याचा असून हा प्रकल्प पूर्ण होण्यास आता आणखी विलंब होऊ नये याकरिता मा. राज्यपाल महोदयांनी  तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत, अशा  मागणीचे निवेदन भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांनी राज्यपाल महाराष्ट्र भगत सिंह कोश्यारीजी यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात राज्यातील कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प हा मराठवाड्यातील अवर्षण प्रवण आणि कायम दुष्काळी तालुक्यांसाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पाचे दोन्ही टप्प्यातील काम पूर्णत्वास गेल्यावर मराठवाड्यातील कायम दुष्काळी, शेतकरी आत्महत्याग्रस्त व निती आयोगाच्या आकांक्षीत (मागास) जिल्ह्यात समावेश असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील ८७१८८ हेक्टर तसेच बीड जिल्ह्यातील २७५४३ हेक्टर अशी एकूण ११४७३१ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येऊन या भागातील पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर होण्यास मदत होणार आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प हा मराठवाड्यातील कायम दुष्काळी तालुक्यांना एकूण २३.६६ अ. घ. फु. पाण्याची योजना असून कृष्णा पाणी वाटप तंटा लवादाने ७ अ. घ. फु. पाणी मान्यता दिल्याने त्या मर्यादेत कामे हाती घेण्यात आली आहेत. उर्वरित १६.३३ अ. घ. फु. पाणी मान्यता मिळणे आवश्यक आहे. केंद्रीय पर्यावरण विभागाच्या मान्यते अभावी तसेच अनेक गंभीर कारणांमुळे ही योजनाच जवळपास रद्दबातल झाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकल्पासाठी दि. ७.४.२०१५ रोजी झालेल्या आढावा बैठकीनंतर केंद्रीय पर्यावरण विभागाने मान्यता नाकारून प्रस्तावित केलेली कारवाई थांबवून मान्यता प्राप्त करून घेतली. प्रकल्पाचा मूळ आराखडा करतानाच आवश्यक असलेले जलविज्ञान संस्थेचे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळविले. लवादाची पहिल्या टप्प्यात ७ अ. घ. फु. पाणी मान्यता मिळवली. चितळे चौकशी समिती अहवालातून सदर प्रकल्प दोषमुक्त केला. राज्याच्या जल आराखड्यात २३.६६ अ. घ. फु. पाण्याची तरतूद प्रस्तावित केली. औरंगाबाद येथे झालेल्या दि. ४.१०.२०१६ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत मराठवाड्यातील उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रास पाणी पुरविण्यास अन्य शाश्वत जलस्रोत व योजना नसल्याने सदर प्रकल्पाचे काम कालबद्ध मर्यादेत पूर्ण करता यावे, या उद्देशाने या कामासाठी लागणारा निधी हा मा. राज्यपाल महोदयांच्या निधी वाटपाच्या सूत्राबाहेर ठेवणेसाठी मा. राज्यपाल यांना विनंती करण्याचा निर्णय घेण्यात आला. सद्यस्थितीत प्रकल्प योजनेच्या पहिल्या टप्प्यातील जेऊर बोगद्याचे २७ कि. मी. पैकी १४ कि.मी. तसेच नीरा भीमा बोगद्याचे २३ कि. मी पैकी १२.५० कि. मी. आणि उद्धट बॅरेजकडील ५० टक्के काम पूर्णत्वास गेले आहे. विनंती की, १) सध्याच्या निधी कपाती प्रमाणे ३३% नुसार मिळणारा निधी न देता तरतुदीनुसार पूर्ण निधी देऊन अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा. २) प्रकल्पाच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव नियामक मंडळाने शिफारस ठराव मंजूर करून सादर केला असून मंत्रिमंडळाचा सुप्रमा मान्यता बाबतचा निर्णय होणे आवश्यक आहे. ३) शासनाने २०१८ मध्ये प्रकल्पातील कामांचा प्राधान्यक्रम निश्चित केला असून त्यानुसार कामे प्रगतीपथावर आहेत. त्यासोबतच पुढील प्राधान्यक्रमातील टप्पा-२ ते टप्पा-५ मधील कामे प्राधान्यक्रमानुसार घेणे आवश्यक असून त्या अनुषंगाने फेरनियोजन प्रस्तावास मान्यता मिळणे आवश्यक आहे. ४) राज्य शासनाच्या दि. ४.५.२०२० च्या आदेशान्वये नवीन कामांच्या अंदाजपत्रकांना तांत्रिक मान्यता व निविदा काढण्यास मनाई केली आहे. या प्रकल्पांतर्गत दुधाळवाडी साठवण तलाव व रामदरा साठवण तलाव पर्यंतच्या तसेच लिंक ५ अंतर्गत कामांच्या अंदाजपत्रकांना तांत्रिक मान्यता व निविदा काढण्यास परवानगी देणे आवश्यक आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प हा मराठवाड्यातील अवर्षण प्रवण व कायम दुष्काळी भागातील शेती सिंचन आणि पिण्याच्या पाणी प्रश्नी अत्यंत महत्वाकांक्षी व जिव्हाळ्याचा असून हा प्रकल्प पूर्ण होण्यास आता आणखी विलंब होऊ नये याकरिता मा. राज्यपाल महोदयांनी वरील प्रमाणे तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांनी निवेदनात केली आहे. यावेळी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार  रमेश कराड, उपस्थित होते.

 
Top