Views


*सास्तूर येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी -- धनगर समाजाची मागणी*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमाविरुद्ध कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी आपल्या स्तरावरून विशेष उपाययोजना करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील धनगर समाजाच्या एका गरीब कुटुंबातील 10 वर्षीय अल्पवयीन मुलीचे आई-वडील कामासाठी बाहेर गेल्याचे व घरामध्ये कोणीही नसल्याची संधी साधून त्या पीडित मुलीवर घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन 3 नराधमांनी अतिप्रसंग केल्याची व माणुसकीला काळिमा फासणारी घटना दिनांक 18 ऑक्टोंबर 2020 रोजी दुपारच्या 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सदर पीडित मुलीने घडल्या प्रकाराबाबत भीतीपोटी घरात कोणालाही या घटनेची माहिती दिली नाही. दुसऱ्या दिवशी दिनांक 19 ऑक्टोंबर 2020 रोजी पीडित मुलीस उलट्या व जुलाब व इतर असह्य वेदना होत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्या बालिकेस सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पीडित मुलीसोबत कांहीतरी अनुचित प्रकार घडल्याचा संशय बळावल्याने डॉक्टरांनी सावध पवित्रा घेऊन त्या पीडित मुलीस विश्वासात घेऊन विचारणा केली असता यावेळी मुलीने गावातील 3 अल्पवयीन मुलांनी सामूहिक रित्या अत्याचार केल्याचे सांगितले. या घटनेची माहिती तात्काळ डॉक्टरांनी पोलिसांना दिली. दरम्यान पीडित मुलीची प्रकृती गंभीर झाल्यामुळे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय लातूर येथे पाठविण्यात आले असून पीडितेची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून 3 जणांविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात दिनांक 20 ऑक्टोबर 2020 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी असून देशासह, राज्यात, गाव, वाडी, वस्ती, तांड्यासह सर्वत्र महिला, मुली, अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार बलात्कार, विनयभंग, अशा अनेक घटना घडत असल्यामुळे मुली, महिला या सुरक्षित नसल्याचे चित्र सध्या पहावयास येत असून ही अत्यंत निंदनीय बाब आहे. असे कॄत करणाऱ्या नराधमांना कायद्याचा  व पोलिस प्रशासनाचा कसलाही धाक नसल्याचे  स्पष्ट होत असल्यामुळेच दिवसेंदिवस अशा घटना मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. धनगर समाजावर सर्वत्र अन्याय
अत्याचार यासह आदी घटना घडत असल्याने धनगर समाज सुरक्षित नसल्याचे व समाजात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने याकडे राज्य सरकारने तात्काळ लक्ष देऊन धनगर समाजावर होणाऱ्या अन्यायाला न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. या निवेदनावर गणेश दादा सोनटक्के जळकोट, रघुवीर घोडके, उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, दिक्षित गोवाडे, उमाकांत लांडगे, दगडू तिगाडे, काशीनाथ घोडके, आदींच्या सह्या आहेत.
 
Top