Views


सारोळा - मसोबा पाटी रस्त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करा ग्रामपंचायत सदस्य बाकले यांची निवेदनाद्वारे मागणी लवकरच निविदा काढण्याची ग्वाही

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

 बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित सारोळा- शिंदेवाडी - मसोबापाटी या ५.४७ किमी रस्ताकामाची तातडीने ई-निविदा काढून काम सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिता पाटील यांच्याकडे शुक्रवारी (दि.११) निवेदनाद्वारे केली आहे. तसेच या कामाची लवकरच निविदा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही श्रीमती पाटील यांनी यावेळी दिली. निवेदनात म्हटले की, उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बुद्रूक) ते शिंदेवाडी-मसोबा पाटी या ५.४७ किमीच्या रस्ताकामासाठी मुख्यमंत्री ग्रामडक योजनेतंर्गत प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. तसेच ३ कोटी ४१ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. याशिवाय सारोळानजिक सबमर्शिबल पुलासाठीही १ कोटी २५ लाख रूपयांचा निधी प्रस्तावित आहे. मात्र गत वर्षभरापासून रस्ताकामाची ई-निविदा काढण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात ई-निविदा नसल्याने कामासही सुरूवात झालेली नाही. सारोळा, शिंदेवाडीसह वाघोली गावातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना सध्यस्थितीत रस्त्याअभावी अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.या रस्त्याची ई-निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून कामास सुरूवात करून ग्रामस्थांना दिलासा देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिता पाटील यांनी या कामाची ई-निविदा प्रक्रिया होण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू असून येत्या एक ते दीड महिन्यात प्रक्रिया सुरू होईल, असे आश्वासन श्री. बाकले यांना देण्यात आले.

 
Top