Views


*माझी गृहलक्ष्मी माझी जबाबदारी या भावनेतून माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबवा-जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर*

 *उस्मानाबाद:-(सैफोद्दीन काझी)*

तुळजापूर तालुक्यात व शहरात कोरोना  (कोव्हिड-19) चा प्रार्दुभाव वाढतच आहे. या वाढत्या कोरोना प्रार्दुभावास प्रतिबंध करण्यासाठी तुळजापूर तालुक्यात माझी गृह लक्ष्मी माझी जबाबदारी या भावनेतून माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले.
तुळजापूर येथील तहसिल कार्यालयात वाढत्या कोरोना रुग्ण्‍ संख्येच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.या बैठकीस उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तुळजापूर तालुक्याचे कोरोना नोडल अधिकारी महेंद्रकूमार कांबळे, तहसिलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास पवार,वैद्यकीय अधिक्षक डॉ.चंचला घोडके, नगर परिषद मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर म्हणाले की, तुळजापूर येथील वाढत्या कोरोना रुग्णसंख्ये विषयी चिंता व्यक्त करुन सर्वांनी यात प्रामुख्याने तुळजापूर शहरातील नागरीकांनी सजग राहून सर्वांनी  Social Distancing,Mask व Sanitizing करुन कोरोनावर मात करणे नितांत गरजेचे आहे. तुळजापूर तालुक्यामध्ये रुग्णांची संख्या 1156 एवढी झालेली असून सद्यस्थितीमध्ये 229 एवढया रुग्णांवर उपचार सुरु आहेत. या बैठकीमध्ये त्यांनी तुळजापूर तालुक्यात माझी गृहलक्ष्मी माझी जबाबदारी या भावनेतुन माझे कुटूंब-माझी जबाबदारी मोहिम राबविण्याचे आवाहन केले. 
या दोन्ही मोहिमेत आरोग्य विभाग, नगर पालिका विभाग, महसूल प्रशासन व पंचायत समिती विभाग आणि स्वयंसेवक यांनी एकत्रित मिळून तालुक्यातील प्रत्येक कुटूंबापर्यंत व व्यक्तिपर्यंत पोहचून प्रत्येक नागरिकांचे तापमान मोजणी, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासणी, तसेच सर्दी, खोकला व ताप असलेले रुग्ण शोधणे, इतर दुर्धर आजारग्रस्त रुग्णांची तपासणी करुन यामध्ये जे रुग्ण संशयीत असतील, अशा रुग्णांना तात्काळ विलगीकरण करुन सदर रुग्णांची कोविङ-19 ची तपासणी व उपचार तात्काळ करुन घेणेबाबत सुचित केले.
तुळजापूर शहरात श्री तुळजाभवानी मंदिरातील काही पुजारी यांना मागील काळात कोरोनाची लागण झालेली असून सर्व पुजारी बांधवानी स्वतः पुढे येऊन कोरोना विषयक चाचण्या करुन घेण्याचे जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले. यापुढे तुळजापूर शहरामध्ये प्रवेश करताना चेकपोस्ट तयार करावेत व त्याच ठिकाणी येणाऱ्या भाविकांची व इतर व्यक्तिची तापमान मोजणी, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासणी करण्याचे निर्देश सर्व विभागांना दिले.ज्या कुटुंबात कोरोना रुग्ण आढळतील अशा रुग्णांना त्यांचे घरी विलगीकरणाची व्यवस्था असेल तर त्यांना त्यांचे स्वयंघोषणापत्र घेऊन व डॉक्टरच्या सल्ल्याने गृहविलगीकरण करण्याची परवानगी देण्यात यावी असे सांगितले.
माझी गृहलक्ष्मी माझी जबाबदारी या भावनेतुन माझे कुटूंब-माझी जवाबदारी या मोहिमेत सर्व नागरिकांनी सहभागी होऊन कोरोना प्रतिबंध विषयक जनजागृती तसेच सदर मोहिमेत आढळून आलेले संशयीत रुग्ण यांना तात्काळ कोरोना चाचण्यासाठी सर्वतोपरी व्यवस्था करुन वाढत्या रुग्णसंख्येवर आळा घालण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
तालुक्यात सध्या प्रतिबंधात्मक आदेश लागू असून पोलिसांनी 5 पेक्षा जास्त व्यक्तिंना एकत्रित येऊ देऊ नये. तसेच गर्दीच्या ठिकाणी शासनाच्या सुचनांचे पालन होत नसले तर कारवाई करण्याच्या सुचना यावेळी जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांनी दिल्या. या आढावा बैठकीस तालुक्यातील संबंधित विभागाचे अधिकारी ,डॉक्टरर्स उपस्थित होते.

 
Top