Views

*सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्सची बदनामी करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचा डाव फसला!*
*मनसेच्या दादा कांबळेविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल*

 उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये रुग्णांची लूट होत असल्याची तक्रार देऊन आणखी बदनामी करण्याची धमकी देत पैशांची मागणी करणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हा सचिव दादा कांबळे याच्याविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.19) गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्सचे कर्मचारी दादासाहेब कोरके यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सामाजिक कार्याचा आव आणून स्वतःच लूटमार करणार्‍याचे पितळ यामुळे उघडे पडले असून  दादा कांबळे याचा पैसे उकळण्याचा डाव मात्र फसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हा सचिव दादा कांबळे याने 14 सप्टेंबर 2020 रोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन सह्याद्री हॉस्पिटल्समध्ये रुग्णांची लूट होत असल्याची कथित तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्सचे कर्मचारी दादासाहेब कोरके यांची 16 सप्टेंबर रोजी दादा कांबळे याने नगर परिषद कार्यालय परिसरात भेट घेेऊन डॉक्टर साहेबांना आम्ही पैसे मागू शकत नाही. तुम्हीच पैसे द्या, मी तक्रार मागे घेतो, असे सांगून एक लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर दादासाहेब कोरके यांचा मोबाईल नंबर घेऊन पैशाची व्यवस्था करा नाहीतर पालकमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले. त्याच रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दादा कांबळे याने कोरके यांच्या व्हाटस्अ‍ॅपवर मेसेज पाठवून पालकमंत्री आले असल्याची आठवण करुन दिली. दुसर्‍या दिवशी 17 सप्टेंबर रोजी दुपारी 1.50 वाजता दादा कांबळे याने दादासाहेब कोरके यांना फोन करुन सेंट्रल बिल्डींगजवळ येण्यास सांगितले. त्यानुसार दादासाहेब कोरके हे मित्रासोबत तेथे गेले असता दादा कांबळे तेथे नव्हता. पुन्हा 2.30 वाजता फोन करुन रामनगर येथे बोलावून घेतले. दादासाहेब कोरके तेथे गेल्यानंतर दादा कांबळे याने सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्सची मान्यता रद्द करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलने करीन, अशी धमकी देऊन एक लाख रुपयांची मागणी केली. तसेच कोणाकडे तक्रार दिल्याच बघून घेईन अशी धमकीही दिली. दरम्यान शनिवारी दादासाहेब कोरके यांनी घडलेल्या प्रकाराबाबत  आनंदनगर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली आहे. त्यावरुन मनसेचा जिल्हा सचिव दादा कांबळे याच्याविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 385 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
----------------------------------------------------------------------*सत्य समोर असल्याने बदनामी करणारे तोंडघशी!*
सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स हे उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यातील सर्व सोयीसुविधांनी युक्त असे हॉस्पिटल आहे. काही दिवसांपासून हॉस्पिटलच्या विरोधात खोट्या तक्रारी देऊन बदनामी करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. काही समाजकंटक वेगवेगळ्या पक्ष, संघटनाच्या नावाचा वापर करुन उपोषण, आंदोलन करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करीत आहेत.  परंतु रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनी दाखविलेल्या विश्वासामुळे आणि सत्य परिस्थिती समोर आल्यामुळे त्या-त्या वेळी तक्रारकर्ते तोंडघशी पडलेले आहेत.यामागचे अदृश्य हात कोण आहेत याचीदेखील पोलीस तपासणी होणार आहे








 
Top