Views




कंटेनमेंट झोनमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी नाही.- जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे...

उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)

 यावर्षी संपूर्ण जगावर कोरोना विषाणूचे संकट कोसळले आहे. उस्मानाबाद जिल्हा प्रशासन कोरोना प्रतिबंधासाठी प्रयत्न करत आहे. परंतु दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी यावर्षी सार्वजनिक गणेश उत्सव गणेशाची प्रतिष्ठापना करून साजरा करू नये. तर सर्व गणेश मंडळांनी या वर्षीचा गणेश उत्सव सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले.
          जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सार्वजनिक गणेश उत्सव 2020 च्या आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे बोलत होत्या. यावेळी पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, निवासी उपजिल्हाधिकारी शिरीष यादव,उप विभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे,उप विभागीय पोलीस अधिकारी फुलचंद राठोड, तहसीलदार गणेश माळी यांच्यासह गणेश मंडळाचे अध्यक्ष,   प्रतिनिधी उपस्थित होते.
       जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे पुढे म्हणाल्या की, कोविड-19 च्या अनुषंगाने या वर्षी जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी सार्वजनिकरीत्या  गणपती न बसवता घरच्या घरीच पर्यावरणपुरक गणपतीची प्रतिष्ठापना करावी. तसेच विसर्जनही घरच्या घरीच करावे. गणेशाच्या मूर्ती या धातू अथवा संगमरवरी नसाव्यात त्या शाडूच्या अथवा पाण्यात सहजपणे विरघळून जाणार्याय असाव्यात. यासाठी गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा तसेच जिल्ह्यातील नागरिकांनीही आपल्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना करताना लहान व विसर्जनाच्यावेळी पाण्यात सहज विरघळणारी मूर्ती बसवावी, असे आवाहन त्यांनी केले.
     जिल्ह्यातील कोणत्याही कंटेनमेंट झोनमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी दिली जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी सांगून यावर्षीचा गणेशोत्सव हा सामाजिक उपक्रमाने जसे की रक्तदान, झाडे लावणे डॉक्टर व नर्सेस यांना पीपीई किटचे वाटप, आर्सेनिक गोळ्यांचे वाटप, विटामिन्स सी व डी गोळ्यांचे वाटप,  त्याप्रमाणेच covid-19 च्या अनुषंगाने रूग्णालयाला तसेच गोरगरीब गरजू रुग्णांना मदत करणे या पद्धतीने साजरा करावा आवाहन त्यांनी केले.
       कोविड-19 चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत चाललेला आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपले एक जबाबदार नागरिक असल्याचे कर्तव्य पार पाडावे व गणेशोत्सव व गौरी पूजनाच्या अनुषंगाने गर्दी न करता कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे यांनी केले. जिल्ह्यातील सर्व महिलांनी गौरी पूजन सणामध्ये गाठीभेटी घेऊ नये. तसेच खरेदीसाठी बाहेर पडू नये व गर्दी करू नये असेही त्यांनी सुचित केले.
     जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात एकाच ठिकाणी गणेशमूर्तीची विक्री करण्याचे स्टॉल न लावता प्रत्येक वार्डात मूर्ती विक्रीचे स्टॉल उभा करावेत व याठिकाणी कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन होईल याबाबत नागरिकांनी स्टॉल विक्रेत्यांनी खबरदारी घ्यावी. जिल्हा व पोलिस प्रशासन आपले काम करणार आहेत. परंतु प्रत्येक नागरिकांनी कोविड-19 चे मार्गदर्शक तत्वे पालन करावे असेही श्रीमतीी मुधोळ मुंडे यांनी सुचित केले.
    यावेळी पोलीस अधिक्षक  राजतिलक रौशन यांनीही गणेशोत्सव व गौरी सणानिमित्त पोलीस विभागामार्फत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी  राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
    प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी शिरीष यादव यांनी सार्वजनिक गणेशोत्सव 2020 च्या अनुषंगाने राज्य शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांची माहिती बैठकीत उपस्थित सर्व गणेश मंडळ यांच्या प्रतिनिधींना दिली तसेच दिनांक 22 ऑगस्ट 2020 रोजी गणेशाची प्रतिष्ठापना व दिनांक 1 सप्टेंबर 2020 रोजी गणेशाचे विसर्जन या अनुषंगाने जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांची कामे  याबाबतची माहिती त्यांनी दिली.

*कोरोना ची पार्श्वभूमी लक्षात घेऊन यावर्षी गणेश मंडळांनी गणेश उत्सव सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा

* कंटेनमेंट झोनमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी नाही

* सर्व गणेश मंडळे व नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेशाची प्रतिष्ठापना आपल्या घरी करावी

* गणेशोत्सव व गौरी सणानिमित्त सर्व नागरिकांनी कोविड-19 च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे.

 
Top