Views


गणेशोत्सव मंडळांनी  रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे-- (सह्याद्री ब्लड बँक उस्मानाबाद)


लोहारा:-(इकबाल मुल्ला)
जगभरात कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सव कालावधीत सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याची प्रथा यामुळे खंडित होत असल्याची खंत गणेश मंडळांकडून व्यक्त केली जात आहे. परंतु या गणेशोत्सवात देखील सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन रक्तदान शिबिरांचे आयोजन करता येऊ शकते. आपले रक्तदान एखाद्याला जीवदान मिळवून देऊ शकते, त्यामुळे गणेश मंडळांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. दरवर्षी अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ  विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन  करतात. यावर्षी प्रथमच कोरोना विषाणू संसर्गाचा फटका मंडळांच्या सामाजिक उपक्रमांना देखील बसला आहे. गणेशोत्सव काळात गर्दी होऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनामार्फतही नियम घालण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक मंडळांकडून अशा काळात कोणता उपक्रम घ्यावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. या काळात रक्तदान शिबिरांचे आयोजन हा एक पर्याय आहे. रक्तदानाची चळवळ गतिमान करण्यासाठी अनेक मंडळे दरवर्षी रक्तदान शिबिरे घेऊन सामाजिक कार्यात मोठे योगदान देत आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात रक्तदान शिबिरांचे आयोजन कमी प्रमाणात होत असल्याने रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांसमोर प्रश्न निर्माण होतो. अशावेळी रक्तपेढीतही रक्त उपलब्ध नसेल तर रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. ही गरज ओळखून गणेशोत्सव काळात जास्तीत जास्त गणेश मंडळांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. शिबिराची तारीख व वेळ कळविल्यास ब्लड बँकेची टीम शिबिरस्थळी उपलब्ध होईल  शिबिराचे आयोजन करण्यासाठी गणेश मंडळांनी सह्याद्री ब्लड बँकेशी संपर्क साधण्याचे आवाहन संचालक शशिकांत करंजकर उस्मानाबाद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
 
Top