Views




महाराष्ट्र हे जागतिक स्तरावरील सर्वोत्तम आरोग्य सुविधा असलेले राज्य घडविणारच -- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उस्मानाबाद येथील  आरटीपीसीआर covid -19 तपासणी प्रयोगशाळेचे ऑनलाइन उद्घाटन

राज्यातील लॅबची संख्या 2 वरून 131 प्रत्येक गावामध्ये कोरोना दक्षता समितीची स्थापना करणार प्रत्येक लॅबमध्ये संशोधनासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करावा, कोरोना वर मात करण्यासाठी सर्व नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी



उस्मानाबाद:-(प्रतिनिधी)
कोरोना विषाणूच्या संकटाने सर्व जग ग्रासले असून या विषाणूची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात 131 प्रयोग शाळा उभारण्यात आल्या आहेत. राज्यातील जनतेला आरोग्यच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असून या माध्यामातून महाराष्ट्र हे देशातीलच नव्हेतर जगातील सर्वोच्च व  सर्वोत्तम आरोग्य सुविधा असणारे राज्य घडविण्याचे स्वप्न असून  ते मी घडविणारच असा ठाम निर्धार व विश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. उस्मानाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र परीसरात उभारण्यात आलेल्या उस्मानाबाद कोविड -19 तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, उस्मानाबाद जिल्हयाचे पालकमंत्री शंकरराव गडाख, जिल्हा परिषदच्या अध्यक्षा प्रा.अस्मिता कांबळे, खासदार ओमप्रकाश राजेनिबांळकर, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, आमदार कैलास घाडगे-पाटील, आमदार ज्ञानराज चौंगुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले,जि.प.उपाध्यक्ष धनजंय सावंत,नगराध्यक्ष मकरंदराजे निबांळकर,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राज गलांडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्हि वडगावे, कोवीड जिल्हा नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शिरीष यादव,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, ही प्रयोग शाळा उभारणीसाठी ज्यांचे ज्यांचे हात लागले आहेत त्या सर्वांचे मी आभार मानतो तसेच कोविड सारखी संकटे येतात आणि जातात संकटात जो पाय रोवून उभे राहतो  व पुढे वाटचाल करतो तेच खरे या संकटावर मात करतात. कोरोनामुळे संपूर्ण जग संकटग्रस्त झाले आहे. या संकटाची तुम्ही सर्वजण पाया रोवून उभे राहिलात त्यामुळे तुमचे मन:पूर्वक धन्यवाद देतो असे सांगुन  ते म्हणाले की,संपूर्ण राज्यात आवश्यकता असेल तेथे प्रयोगशाळा सुरू करीत आहोत. 
 तसेच कोरोनाचा काळ गेल्यानंतर प्रत्येक प्रयोग शाळेत एक विभाग संशोधनासाठी सुरु ठेवला पाहिजे. कोरोनाने जगायचे कसे हे शिकविले असून प्रत्येकाने स्वत: व कुटुंबातील सदस्याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच  प्रत्येक जिल्हयात टास्क फोर्स नेमण्याबरोबरच प्रतयेक गावात कोरोना दक्षता समित्या नेमण्याचे  मुख्यमंत्री ठाकरे यांनी सूचित केले. आपण कितीही प्रयोगशाळा उघडल्या तरी त्या पुऱ्या पडणार नाहीत, त्यामुळे जनतेला सोबत घेऊन व
जनतेने  सतत हात धुणे,दोन व्यक्तीमध्ये अंतर ठेवणे व मास्क लावण्यासाठी  जनजागृती करून ते नियम कठोर पणे व कटाक्षाने पाळावे लागतील असे त्यांनी नमूद केले. व प्रत्येकाने यापुढील काळात स्वयंशिस्त पाळली पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले. हा काळ कोरोना रुग्ण संख्या वाढण्याचा असल्याने कोणीही गाफील न राहता आवश्यक ती काळजी घ्यावी कारण जो पर्यंत आपल्याकडे व्हॅक्सीन (औषध) आपल्या हाताशी येत नाही तोपर्यंत आपण विजय मिळवू शकत नसल्याने जनतेला सोबत घेवून आपल्याला पुढे जायचे आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. यावेळी आरेाग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, या प्रयोगशाळेसाठी नियुक्त केलेल्या कर्मचारी वर्ग हा प्रशिक्षितच असायला हवा. तसेच सर्वानी मिळून काम केल्यास या प्रयोगशाळेचे उदिष्ट पुर्ण होणार असून आयएमएच्या डॉक्टरांची सेवा घेणे गरजेचे आहे.कारण जिल्हयातील मुत्यू दर वाढत असल्यामुळे आवश्यक ती पावले उचलावीत विशेष म्हणजे यापूर्वी तपासणीसाठी इतर जिल्हयावर अवलंबून राहावे लागत होते.मात्र आता ही प्रयोगशाळा सर्व प्रकारच्या तपासणीसाठी उपयुक्त असल्याने जिल्हा स्वावलंबी होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री शंकरराव गडाख म्हणाले की ही प्रयोगशाळा सुरू होण्यास विलंब झाला असला तरी येथील लोकप्रतिनिधी व जनतेची मागणी पूर्ण झाली आहे. येणाऱ्या काळामध्ये या प्रयोगशाळेचा जिल्हयासाठी  नक्कीच फायदा होणार असल्याचे नमूद केले तर कुलगुरू डॉ.प्रमोद येवले म्हणाले की, ही प्रयोगशाळा या विद्यापीठाची दुसरी तपासणी शाळा आहे. मागील महिन्यात या विद्यापीठात 1 हजार 700 नमुने तपासणी ची क्षमता असलेली प्रयोग शाळा औरंगाबादमध्ये सुरू केली आहे. हे देशातील पहिले विद्यापीठ ठरले असून उद्योजकाकडून त्यासाठी निधी उभा राहीला आहे. येथील प्रयोग शाळे संदर्भात  विद्यापीठ सिनेंट सदस्य प्रस्ताव सादर केला व लॉकडाऊनच्या काळात हे कार्य सर्वांच्या सहकार्यांने पार पडले, विषाणू बाबत औरंगाबाद येथे संशोधन सुरू केले असून कोरोना सोबत भविष्यात तोंड देण्यासाठी जैविक विभाग स्थापन करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी या प्रयोगशाळा उद्घाटनाचे प्रस्ताविक केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद अंतर्गत   covid-19 तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या आव्हानाला जिल्ह्यातील दानशूर व्यक्तींनी प्रतिसाद देऊन सुमारे 71 लाखाचा निधी प्रशासनाकडे जमा केला अशी माहिती त्यांनी दिली तसेच या प्रयोगशाळेच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रमाणावर तपासण्या करण्यात येतील असे त्यांनी सांगितले. *प्रयोगशाळेसाठी सहकार्य केलेल्या देणगीदारांची यादी* -- उस्मानाबाद जनता सहकारी बँक, जिल्हा सहकारी पतसंस्था, फेडरेशन नॅचरल शुगर, धाराशिव शुगर, भाऊसाहेब बिराजदार सहकारी बँक, गोकुळ शुगर, भाई उद्धवराव पाटील सहकारी पत संस्था, बालाजी अमाईन्स , डी मार्ट ,रिन्यू एनर्जी , श्री विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना, उस्मानाबाद जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्था, उस्मानाबाद जिल्हा पाटबंधारे, कर्मचारी सहकारी पतसंस्था , शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, लोकमंगल मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कर्मचारी पतसंस्था, एन साई  मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, तामलवाडी इंडस्ट्रियल असोसिएशन, रुपामाता अग्रोटेक व इतर जिल्ह्यातील पतसंस्था सहकारी संस्था व छोट्या-मोठ्या आस्थापनांनी मदत केली. या कार्यक्रमास सर्व देणगीदार साखर कारखाना,सहकारी बॅक, पतसंस्था व कंपनी व्यवस्थापनाचे चेअरमन, प्रतिनिधी व लोकप्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार उपजिल्हाधिकारी शिरीष यादव यांनी मानले.
 
Top