Views




मुरूममध्ये आणखीन एक कोरोना पॉझिटिव्ह परिसर सील 

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
मुरूम शहरातील हनुमान मंदिर परिसरात एक रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे कळताच परिसर प्रशासनाकडून दि.15 जुलै रोजी दुपारी सील करण्यात आला. अशोक चौक ते हनुमान मंदिर पर्यंतचा मुख्यरस्ता व सोनार गल्लीकडे जाणारा रस्ता सील करण्यात आला व सदर परिसर नगर परिषदेच्या वतीने निर्जंतुकीकरण करण्यात आला. सदर रुग्ण आजारी असल्याने त्यांची मुलगी व जावई यांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी  नेले असता येथे ऑक्सिजनची कमतरता असल्याने या रुग्णास उमरगा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथूनच त्यांचा स्वॅब लातूर येथे पाठविण्यात आला होता. या रुग्णालाही लातूरला हलविण्यात आले असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर रुग्णावर लातूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान शहरात रुग्ण असतानाच काही दिवसांपूर्वी हा रुग्ण बरा न झाल्याने त्यांच्या संबंधीत मित्राने त्यांना दुचाकीवरून उपचारासाठी दवाखान्यात नेले होते. सदर रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे बुधवारी (ता.१५) रोजी सकाळी कळल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या सात लोकांना सध्या होम कोरंटाईन करण्यात आले असून हायरिस्क संपर्क म्हणून उद्या त्यांना व उपचारासाठी घेऊन गेलेल्या तरुणासह आठ लोकांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये हलविण्यात येणार आहे. यामध्ये बहीण, दोन मुली, एक नात, तीन भाडेकरू असे एकूण सात जण कोरंटाईन करण्यात आले. कोरोना बाधित रुग्ण व्यतिरिक्त दहा व्यक्तींचा हायरिस्कमध्ये समावेश करण्यात आले आहे. रुग्णाच्या कुंटुबातील सहा, भाडेकरू तीन व इतर एक असे एकूण १० व्यक्तींना हायरिक्समध्ये समाविष्ट करण्याच्या सुचना विठ्ठल उदमले यांनी प्रशासनास  दिल्या. दरम्यान ही परिस्थिती लक्षात घेऊन उमरगातील उपविभागीय महसूल अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार, मुरूम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत बारवकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.सत्यजित डुकरे, नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक उमाकांत देशपांडे, नायब तहसीलदार रोहन काळे, विलास तरंगे, उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे आदींनी या परिसरास भेट देवून संपूर्ण भाग सील करण्यास सांगितले. सदर परिसर नगरपरिषदेच्या वतीने निर्जंतुकीकरण करण्यात आला. दरम्यान या परिसरातील दोन स्वस्त धान्य दुकाने ग्रामीण रुग्णालयाजवळील गोदामात हलविण्यात आली आहेत. सदरील स्वस्त धान्य दुकानाचे कार्डधारकांनी हनुमान गल्ली येथे न जाता त्यांनी ग्रामीण रुग्णालया शेजारील सोसायटी गोदामात त्यांच्या धान्याची व्यवस्था करण्यात आले असल्याचे आवाहन यावेळी पुरवठा अधिकारी तथा नायब तहसीलदार विलास तरंगे यांनी केले आहे.

 
Top