Views


आरोग्य मंत्र्यांचा जिल्हा दौरा; हि तर ‘मॅच फिक्सिंग’- भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे

लोहारा :-(इकबाल मुल्ला)

 आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे हे दि.१९ रोजी उस्मानाबाद दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे. परिस्थिती इतकी गंभीर होईपर्यंत त्यांना यायला वेळ मिळाला नाही मात्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष त्यांना पत्र देतात काय आणि ते त्याला प्रतिसाद देऊन लगेच येतात काय ? हे पाहता ही मॅच फिक्सिंग तर नसावी असा संशय येतोय. आरोग्यमत्र्यांना जिल्ह्यातील जनतेच्या काळजीपोटी यावे वाटले नसले तरी आपल्या पक्षाच्या अध्यक्षांच्या मर्जीसाठी तरी ते येत आहेत याचे समाधान वाटते, अशी बोचरी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून २९ जून रोजी जिल्ह्यात कोविड-१९ चे अँक्टिव्ह रुग्ण ३३ होते १७ जुलै रोजी त्यात पाच पटीने वाढ होऊन ती १७२ झाली आहे.जिल्ह्यात आजतागायत कोरोनाचे २४ बळी झाले आहेत.परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना सरकारचा एकही जबाबदार घटक जिल्ह्यात फिरकलेला नाही. जिल्ह्यात असलेली आरोग्य सुविधांची वानवा पाहता,चाचणीची सोय नसणे या बाबी पाहता आरोग्य यंत्रणेचा आढावा घेऊन त्यात सुधारणा करण्यासाठी आरोग्य मंत्र्यांनी तरी निदान येऊन आढावा घेणे अपेक्षित होते.अवघ्या १५ दिवसात उस्मानाबाद जिल्ह्यात पाच पटीने वाढलेली ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या पाहता ही त्यांची जबाबदारीच होती.उस्मानाबाद पासून ६५ किमी असलेल्या सोलापूरला येण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे मात्र उस्मानाबादला येण्याची त्यांना गरज वाटली नाही ही बाब दुर्दैवी आहे. सर्व घटनाक्रम पाहता या अभूतपूर्व अशा संकटकाळी उस्मानाबादला कोणी वाली आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो, अशीच परिस्थिती राज्यभर आहे. महाविकास आघाडीच्या गलथान कारभाराचा परमोच्च बिंदू म्हणजे आरोग्यमंत्र्यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष त्यांना उस्मानाबादला या म्हणून विनवणी करतात आणि हे सोशल मीडियाच्या माध्यामातून जनतेला कळवतात याचेच आश्चर्य वाटते, असेही भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी सांगितले आहे.



 
Top