Views

*सण-उत्सवानिमित्त जिल्ह्यात*
*जमावबंदी आदेश जारी*
       
उस्मानाबाद/ प्रतिनिधी 

 जिल्ह्यात सण-उत्सव व कार्यक्रम आणि विविध पक्ष तसेच संघटनांच्यावतीने धरणे, मोर्चे, संप, बंद इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ शकतात. या सण-उत्सवानिमित्त जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत.
              दि.28 जुलै 2022 पासून श्रावण मास आरंभ होत आहे. श्रावण महिन्यात शिवमंदिरामध्ये दर्शनाकरिता भाविकांची मोठी गर्दी होत असते. विशेषत: श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. दि.31 जुलै 2022 ते दि.09 ऑगस्ट 2022 या कालावधीत मोहरम हा सण साजरा होणार आहे. मोहरम निमित्त डोले, पंजे, सवारी आदी स्थापना करुन मिरवणुकीने विसर्जन करण्यात येते. दि.01 ऑगस्ट 2022 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव साजरा होणार आहे. दि.02 ऑगस्ट 2022 रोजी नागपंचमी हा सण साजरा होणार आहे. दि.11 ऑगस्ट 2022 रोजी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे सण साजरे होणार आहेत. दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे.
              जिल्ह्यात ग्रामीण तसेच शहरी भागात विविध ठिकाणी यात्रा, जत्रा, ऊरुस लहान मोठ्या स्वरुपात साजरे होणार आहेत. तसेच मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी तसेच विविध पक्ष, संघटना आणि शेतकरी यांच्यावतीने त्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणे, मोर्चे, उपोषण, आत्मदहन, निदर्शने आणि रास्तारोको आदी सर्व प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
              जिल्ह्यात साजरे होणारे धार्मिक सण, उत्सव आणि आंदोलनात्मक कार्यक्रम जिल्ह्यात शांततेत पार पाडण्याकरिता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दि.01 ऑगस्ट 2022 रोजीच्या रात्रीच्या 00.01 पासून ते दि.15 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 31 (1)(3) प्रमाणे जमावबंदी आणि शस्त्रबंदी आदेश संपूर्ण जिल्ह्यात जारी करण्यात येत आहेत.
             शस्त्र, सोटे, काठी, तलवार, बंदूक जवळ बाळगणार नाहीत. लाठ्या, काठ्या, शारिरिक इजा होण्यास कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तू बाळगणार नाहीत. कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटके जवळ बाळगणार नाहीत. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा फोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधे गोळे करुन ठेवता येणार नाहीत किंवा बाळगणार नाहीत किंवा तयार करता येणार नाहीत. आवेशी भाषणे, अंगविक्षेपण, विडंबनात्मक नकला करता येणार नाहीत. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू जवळ बाळगणार नाहीत.
             जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने, वाद्य वाजविणे किंवा कोणतीही कृती जे देशाच्या संविधातील मुल्यांच्या विरुध्द असेल किंवा देशाचा मान आणि सार्वभौमत्व यांना इजा पोहचवणारी असेल किंवा सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहचवणारी असेल आणि जाहीरपणे प्रक्षोभक भाषण आणि असभ्य वर्तन करता येणार नाहीत. व्यक्तीच्या किंवा शवांच्या किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाहीत. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या  कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही किंवा मिरणूक, मोर्चा काढता येणार नाही, असे अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी कळविले आहे.
 
Top