Views
*आरोग्य विभागाच्या उपकेंद्रावरच 'उपचार' करण्याची नौबत ओढवली असून मागच्या पाच दिवसातील संततधार पावसाने छतामधून चक्क ठिबक सिंचन सुरू*कळंब /प्रतिनिधी 


तालुक्यातील मस्सा ख येथील आरोग्य विभागाच्या उपकेंद्रावरच 'उपचार' करण्याची नौबत ओढवली असून मागच्या पाच दिवसातील संततधार पावसाने छतामधून चक्क ठिबक सिंचन सुरू झाले आहे. छतामधून होणार्‍या या जलधारेचा कर्मचार्‍यांसह रूग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.

आठ हजार लोक संख्या आसलेल्या मस्सा ख गावातील नागरिकांना स्थानिक पातळीवर आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने गावात आरोग्य उपकेंद्र कार्यान्वित केले आहे. याठिकाणी एक आरोग्य सेविका व मदतनीस चार आशा कार्यकर्ती नियुक्त केलेल्या आहेत.

अशा या आरोग्य ऊपकेंद्राच्या इमारतीस सध्या पावसाने गळती लागली असून बाहेरून इमारत ठिकठाक दिसत असली तरी थोडा जरी पाऊस झाला तर आतमध्ये मात्र तुषार व ठिबक सिंचनाची अनुभूती येत आहे. यामुळे आरोग्य कर्मचार्‍यांसह उपचारासाठी येणार्‍या रुग्णालाही त्रास सहन करावा लागत आहे. 

चौकट... 
बसायलाच जागा नाही, प्रस्तुती करावी कोठे? 

या प्राथमिक उपकेंद्रात स्वतंत्र प्रस्तुती कक्ष आहे. याठिकाणी अनेक गरोदर माता प्रस्तुतीसाठी येतात. मात्र, सद्यस्थितीत या कक्षात गळती लागल्याने पाणी साचत असल्याने एकीकडे बसायलाच जागा ठिकठाक नसताना प्रस्तुती कशी करायची असा प्रश्न पावसाळ्यात उभा ठाकत आहे. 

चौकट... 
आधी उपकेंद्रावरच उपचार करा! 
ग्रामीण नागरिकांच्या उपचारासाठी निर्माण केलेल्या या उपकेंद्रात गळतीचा प्रश्न निर्माण झाल्याने आधी या उपकेंद्रावरच उपचार करावा व आरोग्य विभागाने लवकर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप तांदळे यांनी केली असून आपण यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले. 
Top