Views


*कळंब शहरातील दोन एटीएम मशीन फोडून २१ लाखांची रोकड लंपास*


कळंब/प्रतिनिधी 


गॅस कटरच्या सहायाने एटीएमच्या दोन मशीन कापून सुमारे २१ लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही घटना आज (ता.२२) पहाटे शहरातील ढोकी रस्त्यावरील एका हॉस्पिटलजवळच्‍या बँक ऑफ इंडिया व ढोकी नाक्यावरील हिताची कंपनीच्या एटीएम सेंटरमध्ये घडली. 
      या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.दोन चोरट्यांनी मास्क लावून मशीन फोडल्या आहे. त्यांनी आलिशान कार घटनास्थळी उभी केल्याची माहिती समोर येत आहे. शहरात पहाटे चोरीच्या तीन घटना घडल्या. दोन एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडून सुमारे २१ लाख रुपये चाेरट्यांनी लंपास केले. र एका कारखान्यातून गॅस कटर चोरल्याची घटना घडली आहे. सीसीटीव्हीमध्ये चाेरटे कैद झाले आहेत.

तात्काळ ठसे तज्ज्ञ‍ांना पाचारण करण्यात आले. बोट किंवा हाताचे ठसे उमटू नयेत यासाठी चोरट्यांनी फवारणी केल्याची चर्चा आहे. जिल्ह्यात मागच्या काही महिन्यांपासून दरोड्यासह चोरीचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढल्या आहेत.

    पहाटे २ वाजून २८ मिनिटांच्या सुमारास दोन चोरांनी ढोकी नाका परिसरातील हिताची कंपनीच्या एटीएम सेंटर उघडून प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी आपल्याकडील असलेल्या गॅस कटरने मशीनच्या पैसे असलेला भाग कापून काढला. त्यातून तब्बल साडे तीन लाख रुपये काढून पसार झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

ढोकी रस्त्यावरील एका हॉस्पिटल शेजारी असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये काही चोरांनी प्रवेश केला . येथील एटीएममशीन गॅस कटरने कापून सुमारे १८ लाख रुपये घेऊन पसार झाल्याची माहिती मिळाली आहे. शहरातील ढोकी परळी वळण रस्त्यावरील नरसिंह ट्रेलर्स कारखान्यातील गॅस कटर चोरीला गेल्याची घटना घडली आहे. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

पहाटे परिसरातील आजूबाजूला असणाऱ्या दुकानदारांना एटीएम फोडल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांना संपर्क केला. उपविभागीय पोलीस अधिकारी एम. रमेश, कळंब पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, सहायक पोलिस निरीक्षक अतुल पाटील यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. तिन्ही घटनेची सविस्तर तक्रार घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्राप्त झालेल्या सीसीटीव्हीचे फुटेज, हाताचे ठसे व इतर पुराव्याच्या आधारे आम्ही योग्य तपास करू, असं पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी सांगितले.
 
Top