*कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विजबिलापोटी तोडलेले कनेक्शन जोडून वीज बिल माफ करण्यात यावे -- भाजपा कळंब*
उस्मानाबाद/प्रतिनिधी
कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विजबिलापोटी तोडलेले कनेक्शन जोडून वीज बिल माफ करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन भाजपा कळंब तालुका यांच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपविभागीय कार्यालय कळंब यांच्या मार्फत देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असताना वीज बिलापोटी सरसकट वीजपुरवठा बंद करून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. एकीकडे तुटपुंजी मदत करून शेतकऱ्यांचा कळवळा दाखवायचा तर दुसरीकडे सक्तीची वीज वसुली सुरू करून या हाताने दिलेले त्या हाताने व्याजासकट वसूल करण्याचा गोरखधंदा सरकारने सुरू केला आहे. रब्बी हंगामात वीज पुरवठा खंडित करून शेतकऱ्यांना खिंडीत गाठण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत असून शेतकर्यांच्या संयमाचा आता अंत झाला आहे. त्यांच्या आक्रोशाचा विस्पोट होण्याअगोदर सक्तीची वीज वसुली बंद करून कृषि पंपांचा तोडलेला वीजपुरवठा पुर्ववत करण्याचे आदेश तत्परतेने व्हावेत, अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल. यावर्षी अगदी एप्रिल पासून राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे, शेत जमिनीचे, घरांचे व दुकानांचे अभूतपूर्व असे नुकसान झाले आहे. दुर्दैवी जिवीतहानीच्या घटना देखील या अनुषंगाने घडल्या आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान प्रचंड स्वरुपात झाल्यामुळे दुसरे काही उत्पन्न त्यांच्याकडे उपलब्ध नाही. यात शासनाकडून स्थायी आदेशाप्रमाणे अत्यंत तुटपुंजा व किरकोळ स्वरुपात मदत निधी देण्यात आला. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पीक विम्याचा तर अजून पत्ताच नाही. अशा परिस्थितीत अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना या सरकारने वीज बिल माफ करून दिलासा देणे अपेक्षित असताना वीज बिल भरण्यासाठी तगादा लावून वीज तोडणी चालू केली आहे. तरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विजबिलापोटी तोडलेले कनेक्शन जोडून वीज बिल माफ करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजित दादा पिंगळे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील, प्रशांत लोमटे, माणिक बोंदर, संजय जाधवर, बजरंग शिंदे, संदीप बाविकर, शिवाजी बाराते, शिवाजी शेंडगे, नारायण टेकाळे, संतोष सांगळे, दीपक चोरघडे, आबासाहेब गायकवाड, गोविंद अडसूळ, अशोक क्षीरसागर, गोविंद गायकवाड, यांच्यासह शेतकरी बांधव, भाजपचे व युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.