Views




*उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे झालेले नुकसान भरपाई देण्यात यावी -- शेतकरी संघटना*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे झालेले नुकसान भरपाई म्हणुन शासनाने हेक्टरी ५०,०००/- रु. देण्याची व्यवस्था करावी व नुकसान -झालेल्या पिकांचा पिक विमा १०० टक्के जाहीर करावे, अशा मागणीचे निवेदन शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की,
 अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रामुख्याने सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या "प्रमाणात नुकसान झाले आहे. बहुतांश पिके पाण्याखाली आहेत. शासनाने पंचनाम्याचे ढोंग न करता शेतकऱ्यांना सरसगट हेक्टरी ५०,०००/- रु. नुकसान भरपाई जाहीर करावी. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जोरदार पाऊस पडत आहे. पावसाने यावर्षीची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने जलप्रकल्प तुडुंब भरले आहेत यातील काही पाणी नदीपात्रात सोडण्यात आलेले आहे. अतिवृष्टी व नदीचे पाणी शेतीसह शेतकऱ्यांच्या शेतात घुसले आहे. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांच्या जमीनी पिकांसह वाहुन गेल्या आहेत. पिके पाण्याखाली गेल्याने ती पिके शेतकऱ्यांच्या हातुन गेली आहेत. पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
शासन निकषानुसार ३३ टक्क्यांपेक्षा नुकसान आणि ६५ मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस झाल्यास पंचनामे करण्याची गरज नाही. सध्या जिल्हयात ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. ९० ते ९५ मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला आहे त्यामुळे शासनाने पंचनाम्याचा कोणताही बहाणा न करता सरसगट हेक्टरी ५०,०००/- रु. नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी. तसेच १०० टक्के विमा जाहीर करावा, अन्यथा ५०,०००/- रु. नुकसान भरपाई न दिल्यास व १०० टक्के विमा जाहीर न केल्यास शेतकरी व शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हयात तीव्र अंदोलन करण्यात येईल. या अंदोलनामुळे जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार शासन व प्रशासन राहिल,असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर मराठवाडा अध्यक्ष रामजीवन बोंदर, मारूती कारकर, संजय वाघ, सिध्देश्वर सुरवसे, आदींच्या स्वाक्षरी आहेत.
 
Top