Views
*सारोळा येथे पीककर्ज नुतनीकरण मेळाव्यास प्रतिसाद शेतकऱ्यांना वाढीवसह पीक कर्ज देणार -- शशी रंजन नारायण*

उस्मानाबाद/इकबाल मुल्लाउस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बुद्रूक) येथे भारतीय स्टेट बँकेच्या वतीने बुधवारी (दि.२२) घेण्यात आलेल्या पीक कर्ज नुतनीकरण मेळाव्यास प्रतिसाद मिळाला. बँकेचे मुख्य प्रबंधक शशी रंजन नारायण यांनी शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे केवळ व्याज भरून नुतनीकरण करून घ्यावे, बँकेकडून तात्काळ वाढीव कर्ज देण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचे प्रतिपादन केले. सारोळा येथील ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी हा मेळावा घेण्यात आला. सारोळासह परिसरातील शेतकऱ्यांनी गत दोन वर्षापासून पीक कर्जाचे नुतनीकरण केलेले नाही. त्यामुळे पीक कर्ज वाटप करण्यात अडचणी येत असल्याने हा मेळावा घेण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामस्थांच्या वतीने सरपंच प्रशांत रणदिवे व ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांच्या हस्ते मुख्य प्रबंधक शशी रंजन नारायण व कृषी सहाय्यक अमोल कानडे यांचा शॉल, फेटा व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. जवळपास ३० शेतकऱ्यांनी नुतनीकरणासाठी तयारी दर्शविली असून शुक्रवारी पुन्हा आणखीन मेळावा घेण्यात येणार आहे. जवळपास २०० शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे नुतनीकरण करण्यात येणार असल्याचे मेळाव्यात सांगण्यात आले. तसेच जास्तीत - जास्त शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे नुतनीकरण करून पीक कर्जासह इतर कर्जासह योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य प्रबंधक शशी रंजन नारायण यांनी केले. मेळाव्यास पोलीस पाटील प्रितम कुदळे, भाऊ कासार, उमाकांत मसे, चंद्रकांत देवगिरे, बबलू रणदिवे, शिवाजी मसे, महेश रणदिवे, जोतिराम रणदिवे, काका रणदिवे, दामाजी आगाशे, गोविंद मसे, लक्ष्मण बाकले, राहुल रणदिवे, हुसेन मुजावर, मनोज गाटे, रामलिंग जगदाळे, पांडूरंग रणदिवे, शैलेश शिंदे, बँकेचे राहुल कुंभार, निलेश जावळे आदींसह शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top