Views




*लैंगिक अत्याचार पीडित चिमुरडीस ‘चाइल्ड-लाइन’ने दिला आधार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला



उस्मानाबाद तालुक्यातील एका सहा वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच उस्मानाबाद चाइल्ड-लाइनच्या टीमने संचालक डॉ. दिग्गज दापके - देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार पीडित मुलीची भेट घेऊन तिच्या कुटुंबीयांना देखील समुपदेशन करून मानसिक आधार दिला. आज (दि.29) पीडित मुलीस उस्मानाबाद येथे बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. बाल कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. ए.डी. कदम, सदस्य डॉ.कैलास मोटे, श्री.ए.एन.कोळगे, अ‍ॅड.ए.डी. गोसावी यांनी मुलीच्या कुटुंबीयांचे योग्य ते समुपदेशन करून मुलीस परत आईच्या स्वाधीन करण्यात आले. उस्मानाबाद तालुक्यातील गावामध्ये 55 वर्षीय नराधमाने सहा वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. तिला आमिष दाखवून गावातीलच एकाने हे कृत्य केल्याची माहिती पीडितेने कुटुंबीयांना सांगितल्यावर हा प्रकार चव्हाट्यावर आला. दरम्यान, एका व्यक्तीने 26 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद चाइल्ड-लाइन (1098) शी संपर्क साधून मदतीची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर उसमानाबाद चाइल्ड-लाइनचे समन्वयक ज्ञानेश्वर गिरी, टीम मेंर रविराज राऊत, अमर भोसले, समुपदेशक वंदना कांबळे यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात जाऊन पीडित मुलीची विचारपूस करून धीर दिला. तिच्या कुटुंबीयांची भेट घऊन त्यांचे समुपदेशन करून तक्रार दाखल करण्यास सांगितले. त्यावर कुटुंबीयांनी आपण पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली असून आरोपीला अटक केल्याची माहिती दिली होती.
समाजात अशा निषेधार्ह घटना आजही घडत असल्याचे या घटनेने समोर आले आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या अजाण बालकांच्या सुरक्षेसाठी त्यांचे योग्य समुपदेशन करून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असे मत उस्मानाबाद चाइल्ड-लाइनचे संचालक डॉ.दिग्गज दापके-देशमुख यांनी केले आहे. 
---------------------------------------------------------------------
आपल्या आजूबाजूला विधि संघर्षग्रस्त, हरवलेेले, सापडलेले, वैद्यकीय सेवेची गरज असणारे, कलहामुळे बाधीत झालेले, निवार्‍याची गरज असलेले, शिक्षणाची गरज असणारे, बालविवाह, बालकामगार, बालमजूर, लैंगिक शोषित बालक आढळून आल्यास असल्यास जागरुक नागरिकांनी तात्काळ चाइल्ड - लाइन उस्मानाबादच्या 1098 या टोल फ्री क्रमांकावर तात्काळ संपर्क साधून माहिती द्यावी. उस्मानाबाद चाइल्ड-लाइनची टीम तत्काळ मदतीसाठी हजर होईल.” - डॉ. दिग्गज दापके-देशमुख संचालक, चाइल्ड-लाइन उस्मानाबाद
 
Top