*जल जीवन मिशनच्या कामांच्या सर्वेक्षणास
गती देऊन ते काम एका महिण्यात पूर्ण करा
- पालकमंत्री शंकरराव गडाख*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
जल जीवन मिशनच्या कामांना मुख्यमंत्री यांनी प्राधान्यक्रम दिला आहे. त्यामुळे या कामास आणखी गती देण्याची गरज आहे. जिल्हयातील याबाबतचे सर्वेक्षण करण्याचे काम एका महिन्यात पूर्ण करण्यात यावे. यासाठी आवश्यक असलेल्या अधिकारी- कर्मचारी वर्ग उपलब्ध करुन देण्याचे प्रस्ताव दाखल करा, म्हणजे त्यासही मान्यता मिळवून दिली जाईल, असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी आज येथे केले. उस्मानाबाद जिल्हयातील जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-2 ची आढवा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली, तेव्हा ते बोलत होते. यावेळी राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल, पाणी पुरवठा व रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आ. कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जि.प.च्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, पालकमंत्र्यांचे खाजगी सचिव बप्पासाहेब थोरात, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जि.प.चे उपमुख्यकायर्कारी अधिकारी ( पाणी पुरवठा व स्वछता) श्री. कुंभार, कार्यकारी अभियंता श्री. देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, जि.प.च्या माजी सदस्य सक्षणा सलगर आणि विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तीन महिन्यापूर्वी मी जिल्हयातील जल जीवन मिशनच्या कामाबाबत मुंबईत बैठक घेतली होती. या कामास कशी गती देता येईल, याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार कामास सुरुवात झाली आहे. पण म्हणावी तेवढी गती अद्याप या कामांना आली नाही. प्रामुख्याने जल जीवन मिशन अंतर्गत योजनांच्या सर्वेक्षणाचे काम झाले पाहिजे, त्या गतीने होत नाही. तसेच योजनाचे आराखडाही मोठया प्रमाणात करण्याची गरज आहे, असे सांगून पालकमंत्री श्री.गडाख म्हणाले की, केंद्र सरकार बरोबरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दृष्टिनेही हा विषय प्राधान्याचा आहे.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या योजनेचा आढवा घेवून या योजनेचा अनुशेष पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत. आपला जिल्हा कायम दुष्काळी जिल्हा राहिला आहे. गेल्या वर्षी पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याचे टॅंकर कमी झाले होते, परंतु यापूर्वी बाराही महिने ज्या गावांना टॅंकरने पाणी पुरवठा केला जात होता त्या गावांना या योजनेत प्राधान्य दिले गेले पाहिजे. या गावांना या योजनेचा लाभ झाला पाहिजे, असेही ते म्हणाले. जल जीवन मिशन अंतर्गत सवच्छ आणि योग्य प्रमाणातील पिण्याचे पाणी नळाद्वारे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने या योजनेला प्राधान्य दिले आहे उस्मानाबाद जिल्हयाने या योजनेच्या कामात प्रगती केली आहे. पण हवी तशी प्रगती करण्याची खप गरज आहे. त्यासाठी आवश्यक असलेले अभियंते केंद्र सरकारकडून मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्न तसा प्रस्ताव पाठवावा, खासदार श्री.निंबाळकर यांच्याकडेही प्रस्तावाची प्रत दिल्यास केंद्र सरकारकडे तेही प्रयत्न करतील. या शिवाय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अभियंत्यांची सेवा वर्ग करण्याचाही विचार केला जाईल, पण संबंधित अधिका-यांनी या कामास प्राधान्य देऊन वेळेत कामे पूर्ण करावीत, असे सांगून राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी जिल्हयातील ज्या गावांची लोकसंख्या पाच हजारांपेक्षा अधिक आहे त्या गावांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणी पुरवठयासाठी योजना राबवा. यासाठी अधिकाऱ्यांनी गावांची सर्वेक्षण करुन प्रस्ताव दाखल करावेत, असेही त्यांनी यावेळी आदेश दिले.