*हावरगावचा ग्रामसेवक 10 हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात*
कळंब (प्रतिनिधी)
कळंब तालुक्यात भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी अडकण्याचे सत्र सुरूच आहे. तालुक्यातील हावरगावच्या ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक महेश शिंगाडे याला 10 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे. सोमवारी सायंकाळी 7. 15 वाजताच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, हावरगावचे तक्रारदार यांना गावाच्या वित्त आयोगाच्या प्रकल्प आराखड्यात बदल करून दुसरी कामे समाविष्ट करण्यासाठी सरपंचाना लाच मागितली होती.
याबाबतची सर्व रीतसर तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाला केली होती. या तक्रारीची दखल घेत लाचलुचपत विभागाने सोमवारी सायंकाळी सापळा रचला. कळंब तहसील कार्यालयाच्या परिसरात एका हॉटेलमध्ये तक्रारदाराकडून लाचेच्या स्वरूपात ग्रामसेवकाने 10 हजार रुपये स्वीकारले. यावेळी लाचलुचपत विभागाने लाच स्वीकारताना शिंगाडे याला रंगेहात पकडले.
ग्रामसेवक शिंगाडेला ताब्यात घेऊन कळंब पोलिसात नेण्यात आले. सदरील प्रकारचा सविस्तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कळंब पोलिसात सुरू आहे. मागच्या काही दिवसांपासून कळंब तालुक्यातील शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकण्याचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक राहुल खाडे , अपर पोलीस अधीक्षक मारुती पंडित ला. प्र.वि.औरंगाबाद, प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वी उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनाखाली गौरीशंकर पाबळे , पोलीस निरीक्षक, ला. प्र. वी.उस्मानाबाद यांनी केली. याकामी त्यांना पोलीस अंमलदार, मधुकर जाधव, विष्णू बेळे, विशाल डोके, यांनी मदत केली.
कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क करण्याबाबतचे आवाहन प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद ( मो.नं.९५२७९४३१००) गौरीशंकर पाबळे, पोलीस निरीक्षक, ला. प्रा. वी. उस्मानाबाद ( मो. क्र. 8888813720) अशोक हुलगे, पोलीस निरीक्षक, ला. प्रा. वी. उस्मानाबाद (मो. क्र.8652433397) यांनी केले आहे.