*कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नका -जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आवाहन.....*
उस्मानाबाद:-(प्रतिनिधी)
(दि.24)कोविड-19 चा प्रादुर्भाव अद्याप संपला नाही तेंव्हा नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी तसेच धार्मिक स्थळावर गर्दी करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.
कोरोना-19 संदर्भातील उस्मानाबाद जिल्हा कृती दलाची ( Task Force ) ची बैठक काल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के.पाटील, पोलिस उपअधीक्षक मोतीचंद राठोड, डॉ.स्मिता शहापूरकर, डॉ.मिना जिंतूरकर, डॉ.स्वप्नील यादव, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. के.के. मिटकरी, कुष्ठरोगचे सहायक संचालक डॉ.रफिक अन्सारी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन बोडके, आय.एम.ए.संघटनेचे अध्यक्ष डॉ.सचिन देशमुख, फॉक्सी संघटनेचे अध्यक्ष डॉ.एस.एस.सरडे, आय.ए.पी.संघटनेचे अध्यक्ष डॉ.मुळे, शल्यचिकित्सक सर्वश्री डॉ. तानाजी लाकाळ, डॉ.प्रविण डुमणे, डॉ.गजानन परळीकर आदी उपस्थित होते.
कोविड-19 चा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नाही. आपल्या जिल्ह्यात सध्या रुग्णांची संख्या घटली आहे. परंतु या आजाराच्या साथीचा प्रादुर्भाव थांबला नाही.ब्रिटनमध्ये या साथीचा नवा विषाणू सापडल्याची शंका तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे जगभरातील नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले जात आहे. तसेच भारतात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शंका व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडताना मुखपट्टीचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा, हात धुत रहावे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये,असेही आवाहन करुन श्री. दिवेगावकर यांनी काही नागरिक आजार अंगावर काढतात, रुग्णालयात वेळेवर जात नाहीत. तेंव्हा अशा नागरिकांनी कुठलाही आजार असेल तर त्वरित रुग्णालयात जाऊन उपचार करावेत, डॉक्टरांनी कोरोना टेस्ट करावयास सांगितली असेल तर कोरोना टेस्ट करुन घ्यावी. काही कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत पण काही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत तर,काही रुग्णांमध्ये कोरोनाच्या लक्षणांचे स्वरुप बदललेही दिसून येत आहे,असे तज्ज्ञ डॉक्टरांच्या अनुभवातून स्पष्ट झाले आहे, तेंव्हा नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.