Views

*आजीविका ग्रामीण एक्स्प्रेस योजनेअंतर्गत वाहनाचे वितरण*


 उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
 
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, उस्मानाबाद अंतर्गत लोहारा तालुक्यातील स्फूर्ती महिला ग्रामसंघास आजीविका ग्रामीण एक्स्प्रेस योजनेअंतर्गत ‘महिंद्रा बोलेरो पिक-अप’ या वाहनाचे वितरण उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता समुहातील महिलांना उपजीविकेचे पर्यायी साधन उपलब्ध व्हावे, तसेच मागास व दुर्गम भागात असलेली वाहनाच्या सोयींची कमतरता दुर व्हावी, या हेतुने ही योजना राबविण्यात येत आहे. उस्मानाबाद जिल्हयातील लोहारा तालुक्यातील विविध 5 ग्रामसंघाना मागील आर्थिक वर्षात वाहनांचे वितरण करण्यात आले आहे.उर्वरित एका वाहनाचंदेखील वितरण करण्यात आलं आहे. लोहारा तालुक्यात वितरीत करण्यात आलेल्या वाहनांमुळे ग्रामसंघ तसेच महिलांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उद्योगांना उभारी मिळण्यास मदत होणार आहे. या तालुक्यातील महिलांना वाहतुकीची अडचण दुर होऊन, उद्योगासाठी येणारा वाहतुकीचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.  ग्रामीण भागातील महिलांनी उद्योग व्यवसायात नवनवे प्रयोग करून स्वतःची उन्नती करावी. असे  जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे यांनी सांगितले. आजीविका ग्रामीण एक्स्प्रेस योजनेअंतर्गत मिळालेल्या वाहनांचा उपयोग करून महिला सद्यस्थितीत जो व्यवसाय करत आहेत. त्यामध्ये वाढ होईल, उमेद अभियानाने महिलांना सामाजिक भान दिले आहे. तसेच आर्थिक भान येईल, लोहारा तालुक्यातील महिलांपासुन प्रेरणा घेऊन स्वतःचा सर्वागीण विकास करावा. असे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापक समाधान जोगदंड, लेखाधिकारी अप्पासो पवार,  जिल्हा व्यवस्थापक अमोल सिरसट, गोरक्षनाथ भांगे, तालुका व्यवस्थापक प्रणीता कटकदौंड, प्रभाग समन्वयक अविनाश चव्हाण, तसेच स्फूर्ती ग्रामसंघ द.जेवळीच्या अध्यक्षा तानाबाई सिद्धु मस्के, सचिव ज्योती बाबासाहेब सोनकांबळे, कोषाध्यक्ष  कविता सागर जाधव तसेच समुदाय संसाधन व्यक्ती रुपाली प्रदीप कारभारी उपस्थित होत्या.


 
Top