Views




*राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करून लोहारा तहसील कार्यालयात अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली*

उस्मानाबाद:-( इकबाल मुल्ला)

सार्वजनिक बांधकाम, भूकंप पुनर्वसन, पर्यावरण, रोजगार हमी योजना, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी लोहारा तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीची दिनांक 17 ऑक्टोंबर 2020 रोजी पाहणी करून लोहारा तहसील कार्यालयात अधिकार्‍यांची तालुकास्तरीय आढावा बैठक घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार डॉ. रोहन काळे, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बीडबाग, नायब तहसीलदार रणजीत शिराळकर, यांच्यासह विविध विभागाचे कार्यालय प्रमुख शेतकरी उपस्थित होते. यावेळी राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करावेत, नुकसानग्रस्त एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. नुकसान झालेल्या पिकांचे विमा मिळण्यासाठीचे अर्ज शेतकऱ्यांनी तात्काळ करावे. यासाठी कृषी विभागाने ऑनलाइन, ऑफलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आव्हान यांनी केले. भारतीय कृषी विमा कंपनीने नुकसानीचे पंचनाम्याबाबत अत्यंत तातडीने कारवाई पूर्ण करून शेतकऱ्यांना विम्याची रक्कम उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. या आपत्तीच्या परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. नदीकाठावर शेतकऱ्यांचे बंधारे वाहून गेले आहेत. तसेच बंधाऱ्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांचेही पंचनामे करण्यात यावेत. या शेतकऱ्यांना मदत व पुनर्वसन विभागामार्फत मदत करण्यात येईल, असे आश्वासन राज्यमंत्री बनसोडे यांनी दिले. तसेच लोहारा शहरात मागणी धरणातून पाणी पुरवठा याबाबत चर्चा करून आवश्यक सूचना देण्यात आल्या. तसेच महावितरण अभियंता यांना सुरळीत वीज पुरवठा करण्याबाबत निर्देश देण्यात आले. कोरोणा स्थितीचा आढावा घेऊन तसेच रमाई आवास योजना आणि ग्रामीण पाणीपुरवठा व भूकंपग्रस्त घरांचे समस्येबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी तालुक्यातील शेतकरी यांनी मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे माहिती दिली.  प्रशासनाकडून पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत पंचनाम्याची कारवाई सुरू असून एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात यावे, असे सांगितले.
 
Top