Views


*जिल्हयातील 10 हजार 338 रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात -- जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर*
*उस्मानाबाद जिल्हयाचा रिकव्हरी रेट 80 टक्के*
*जिल्हयात एकूण 64 हजार 625 अँटीजेन व आरटीपीसीआर चाचण्या झाल्या, *नागरिकांनी आजार अंगावर काढू नये, तात्काळ आरोग्य तपासणी करावी*
*माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत आरोग्य पथकांना सहकार्य करावे*

उस्मानाबाद :-(इकबाल मुल्ला)
 
मागील सहा महिन्यापासून जिल्हयात कोरोनाचा संसर्ग वाढत गेलेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपायोजना केल्या जात असून आज रोजी पर्यंत 10 हजार 338 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. जिल्हयाचा रिकव्हरी रेट (रुग्ण बरे होण्याचा दर)हा 80 टक्के असून एकूण जिल्हयात 2 हजार 169 ॲक्टीव्ह रुग्ण आज उपचार घेत आहेत. जिल्हयात एकूण 64 हजार 625 ॲटीजेन, RTPCR चाचण्या करण्यात आल्या आहेत. रुग्णांकरिता 4 हजार 529 CCC बेडस्, 1 हजार 6 ऑक्सीजन सपोर्टेड बेडस्, 196 ICU बेडस् उपलब्ध असून 110 व्हेंटीलेअर्स उपलब्ध आहेत. जिल्हयाचा मृत्युदर हा 3.1 टक्के इतर असून 409 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव/धोका कमी झालेला नाही.जिल्हयातील कोरोना मृत्युंचा विचार करता रुग्णालयात उशिरा दाखल झाल्याने 24 तासात मृत्यु झालेल्या रुणांचे प्रमाण लक्षणीय आहे.अजूनही लोक कोरोनाची लक्षणे साध्या आजाराची समजून आजार अंगावर काढत आहेत. तरी तात्काळ आरोग्य तपासणी करुन घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले आहे. जिल्हयात राबविल्या जात असलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत घरोघरी सर्वेक्षण करताना प्रशासनाला 1000 कोरोना रुग्ण व श्वसन संस्थेशी संबंधित आजार असलेले 1100 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत.यामुळेच जिल्हयातून कोरोनाची साथ ह्द्दपार करण्यासाठी पुढील एक महिना अत्यंत महत्वाचा आहे.अधिकाधिक संशयित रुग्णांना चाचण्या करुन घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे आवश्यक आहे. शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण तपासण्यासाठी (spo2) पल्स ऑक्सीमीटरचा वापर करणे आवश्यक आहे.बोटाला ऑक्सीमीटरचा चिमटा बसवुन रिडींग 95 पेक्षा कमी दिसल्यास तात्काळ चाचणी करुन घेणेही आवश्यक आहे.शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण कमी होऊन कोरोना रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाणही जिल्हयात लक्षणीय आहे. यापुढील काळात सर्व नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगुन गर्दी टाळावी.मास्कचा वापर करावा.हात वारंवार साबणाने धुवावेत.येणाऱ्या माहिन्यामध्ये नवरात्र उत्सव,दसरा व दिवाळी सारखे साजरे होणारे सर्व उत्सव आपण सार्वजानिक ठिकाणी साजरा न करता घरी राहूनचे साजरे करावेत. कोरोनावर मात केल्यानंतर जनजीवन सुरळीत करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.

 
Top