पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन मदत करा-आमदार कैलास घाडगे- पाटील
*उस्मानाबाद:-(सैफोद्दीन काझी)*
पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन मदत करा अशी मागणी उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांचेकडे केली आहे. जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने पावसाचे पाणी सोयाबीन पिकात साचून काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. यंदा हंगामाच्या सूरुवातीलाच बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला तोंड द्यावे लागले होते. त्यातच आताच्या स्थितीला सोयाबीन काढण्याच्या अवस्थेत असताना निर्सगाची अवकृपा झाली आहे.व सतत होत असलेल्या पावसाने सोयाबीनच्या पिकात पाणी साचले आहे. शेंगा पाण्यात राहत असल्याने त्या खराब झाल्या आहेत.
गेल्या काही वर्षात सोयाबीन हे जिल्ह्यातील मुख्य पिक बनले असून, अशा स्थितीमध्ये त्याच पिकाच्या उत्पन्नावर परिणाम झाल्यास शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहे.सोयाबीन शेगांना कोंब फुटत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे, तसेच हा पाऊस थांबणार नसल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे अजुनही पुढे हे नुकसान वाढणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची आवश्यकता आहे असे आमदार पाटील यांनी म्हंटले आहे. याबाबत कृषी विभाग, महसुल विभाग व विमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्याकडुन संयुक्तपणे पंचनामा करण्याचे आदेश देऊन झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना द्यावी.अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.