Views


*लोहारा स्वतःच्या लहान मुलीला आणि स्वतःला काळे फासून नगर पंचायतसमोर उपोषण....*

*उस्मानाबाद:-(सैफोद्दीन काझी)*

लोहारा,इतर वॉर्डमधील मैलामिश्रित घाण पाणी घराच्या परिसरात येत असल्याने संबंधितांवर कारवाई करण्यासंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार तक्रार अर्ज, निवेदने देऊनही लोहारा नगरपंचायतीचे दखल न घेतल्याने सामाजिक कार्यकर्ते उमाकांत लांडगे यांनी आपल्या लहान मुलीसह स्वतःच्या तोंडाला काळे फासून अनोखे आंदोलन केले.
यासंदर्भात उमाकांत लांडगे यांनी सात दिवसांपूर्वी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर लांडगे यांनी हे आंदोलनाचे अस्त्र हाती घेतले होते.
याविषयी बोलताना लांडगे म्हणाले की, वॉर्ड क्रमांक 13 मध्ये माझ्या मालकी हक्काचा प्लॉट असून वॉर्ड क्रमांक 14 मधील बोअरचे पाणी सातत्याने माझ्या प्लॉटच्या कंपाउंड भिंतीमध्ये शिरत आहे. सतत पाणी लागून राहिल्याने माझ्या कंपाउंडच्या भिंतीला पाझर लागून तडे गेले आहेत. यासंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून मी नगरपंचायतीचे अधिकारी व नगरसेवकांकडे विनंती करीत आहे. मात्र कोणीही त्याची दखल घेतली नाही.
छोट्याश्या प्रश्नासाठी एका बापाला आपल्या मुलीसह अशाप्रकारे आंदोलन करावे लागणे हे खरेतर दुर्दैव आहे. माझ्या या आंदोलनामुळे खऱ्या अर्थाने नगरपंचायतीच्या अधिकारी व नगरसेवकांच्या गैरकारभाराचे धिंडवडे निघाले असून कमीत कमी यापुढे तरी या समस्येवर तातडीने हालचाल करून हा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा यापुढे हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा उमाकांत लांडगे यांनी दिला आहे.
 
Top