*वाशी शिवारामध्ये सापडला अनोळखी पुरुषाचा मृतदेह....*
उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)
शहरातून मार्गाकडे जाणाऱ्या कन्हेरी रोड लगत शेतामध्ये मंगळवारी अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शहरातून राष्ट्रीय महामार्ग कडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या जगताप यांच्या शेतामध्ये मुख्य रस्त्यापासून 400 फूट अंतरावर असलेल्या ऊस व सोयाबीन पीक असलेल्या बांधावरील लिंबाच्या झाडाखाली हा अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडला. हा व्यक्ती मृत होऊन किमान पाच दिवसाचा कालावधी लोटला याचा अंदाज असून सुटलेल्या दुर्गंधी वरून ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक उस्मान शेख, उपनिरीक्षक अशोक चव्हाण, उपनिरीक्षक किशोर चोरगे, पोहेकॉ किरण शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतदेह पूर्णपणे सडलेला असल्याने येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महावीर कोटेचा यांनी घटनास्थळी शवविच्छेदन केले तर नगरपंचायत कडून मशिनच्या साह्याने खड्डा घेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
पी.पी.ई किट शिवाय मृतदेहाला हात लावण्यास नकार..
मृतदेहाच्या शवविच्छेदे नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आलेल्या नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडून पी.पी.ई किट नसल्यामुळे अंत्यसंस्कार करण्यास नकार देण्यात आला. यामुळे काही काळ अंत्यसंस्कार रखडले होते. नकार दिल्याने नगरपंचायत कडून किट उपलब्ध करून देण्यात आले त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.