Views
धावपळीचे नाही समाधानाचे जीवन जगा - दीपा मुधोळ - मुंडे


लोहारा:-(इकबाल मुल्ला)
आपण सर्वजण जीवंत आहोत ते केवळ निर्सगामुळे निर्सग आपणाला ऑक्सिजन देण्याचे काम करीत आहे.परंतु आपण निर्सगाला काय देतो ? हा प्रश्न सतत आपणाला पडला पाहिजे. प्रत्येक सामान्य माणसांनी जगण्यासाठी सतत प्रयत्न करणे आवश्यक असून आपण ज्या ठिकाणी किंवा ज्या क्षेत्रात काम करतो तेथे चांगले काम करावे, कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा न करता ते काम केल्यास तडीस जाते व आपणाला देखील समाधान लाभते. त्यामुळे प्रत्येकाने धावपळीचे जीवन जगण्याऐवजी  समाधानाचे जीवन जगावे असे आवाहन नुकत्याच बदली झालेल्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांनी केले. उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांची बदली झाल्यानिमित्त सत्कार तर नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन दि.28 ऑगस्ट 2020 रोजी करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रा.अस्मिता कांबळे,  जिल्हा पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, निवासी उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, सहाय्यक जिल्हा निवडणूक अधिकारी प्रताप काळे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, जि.प.सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय तुबाकले, तहसिलदार गणेश माळी, अपर पोलीस अधीक्षक संदीप पालवे, उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड, उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनजंय रणदिवे, आदीसह महसूल, पोलीस, जिल्हा परिषद अधिकारी व पत्रकार मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना मुधोळ – मुंडे म्हणाल्या की, मला जो कार्यकाळ लाभला त्या कालावधीत मी कुठल्याही प्रकारचा कोणाचाही मनात व्देष न ठेवता कामे केलेली आहेत. ज्या ज्या ठिकाणी चांगले काम करता येईल याचा विचार करून चांगले निर्णय घेतलेले आहेत.यासाठी अधिकारी कर्मचारी व सामान्य जनता यांनी अतिशय खुप चांगले सहकार्य केलेले आहे. मी बाहेर जिल्हयात बदलून गेले तरी यापुढेही चांगलीच कामे झालीच पाहीजेत असे सांगुन त्या म्हणाल्या की, जिल्हाधिकारी येतात जातात परंतू स्थानिक असणाऱ्या नागरिकांनी विशेषत: लोकप्रतिनिधी, पत्रकार यांनी सतत चांगली कामे केली पाहिजेत असे आवाहन त्यानी केले. तसेच हा जिल्हा संताची भूमी असून कोरोना कालावधीत 50 वर्षापुर्वीच्या जीवन पध्दतीचा आपण अवलंब करून ते जीवन जगलो आहोत. त्यामुळे असे कायमचे जीवन जगले पाहिजे. अशी भावनिक सादही त्यांनी जिल्हावासियांना घातली. विशेष म्हणजे जिल्हयात ग्रीन झोन नसल्याने मी जिल्हयातील नागरिक व वनविभागाच्या माध्यमातून जिल्हयासह तालुक्याच्या ठिकाणी ग्रीन झोन तयार केलेले आहेत. त्याचा वापर करण्यासाठी ते जपणे आवश्यक असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, तेर येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या भूमीचा विकास करता आलेला नाही, याची मला खंत असून तो विकास लोकसहभागातून करावा, असे आवाहनही त्यानी  केले. तसेच पर्यावरणाचे संतूलन राखण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यासह प्रत्येकांनी सायकलीचा वापर करून टू - व्हिलर, फोर - व्हिलर टाळण्याचा प्रयत्न करणे काळाची गरज असल्याचे त्यानी नमूद केले. विशेष म्हणजे नागरिकांनी कोरोनाच्या कालावधीत ज्या चांगल्या शिस्तीचे पालन केले आहे. तशा प्रकारचे  पालन इतरांनी करावे, अशी अपेक्षा न ठेवता स्वत:च करणे आवश्यक असून कुटुंबाच्या सुरक्षित आरोग्यासाठी स्वत:च्या आरोग्याकडे कोणत्याही परिस्थिीतीत दुर्लक्ष न करता लक्ष देणे हे आपले प्रथम कर्तव्य समजले पाहिजे, असे आवाहन ही त्यांनी केले. तर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर म्हणाले की, दर शंभर वर्षानी वेगवेगळया स्वरूपाची महामारी येत असते. यंदाच्या कोरोना संकटाशी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांनी सामना करण्यासाठी अतिशय नियोजनबध्द काम केले आहे. त्यांनी ठिकठिकाणी कर्तव्य बजावताना कठीण काळात अडचणीतून मार्ग काढला असून त्यानी जिल्हयात विविध विकास कामाची विशेषत: कोविडच्या कामाची अतिशय चांगली पायाभरणी केलेली आहे. त्यामुळे नागरिकानी या काळात कोरोना आजाराबाबत निष्काळजीपणा न करता सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे असून एक - एक जीव महत्वाचा आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत, अशा प्रत्येकाची तपासणी होणे आवश्यक असून आगामी दोन महिने अत्यंत महत्वाचे असून प्रत्येकानी तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यानी केले. तसेच मुधोळ – मुंडे यांनी जी विकासात्मक कामाची पायाभरणी केली आहे. त्याला कुठल्याही प्रकाराचा तडा जावू देणार नाही. त्यासाठी या पुढच्या काळात त्यांनी घालून दिलेल्या पायंडयावर वाटचाल करू असे आश्वासनही त्यानी दिले. यावेळी डॉ.संजय कोलते म्हणाले की, मुधोळ-मुंडे याच्या काळात अधिकारी व कर्मचारी यांचा चांगला समन्वय असल्यामुळे विविध विकास कामे करणे शक्य झाले आहे. तर जि.प.
अध्यक्षा प्रा. अस्मिता कांबळे म्हणाल्या की, स्त्री म्हणून मला मुधोळ - मुंडे यांचा विशेष आनंद वाटतो. कारण त्यांचा प्रथमच अशा प्रकारचा मोठा सत्कार होत असून त्यांनी प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. कोरोना संकटाच्या काळात आरोग्य यंत्रणा तोकडी  असताना देखील वाडी, वस्ती व प्रत्येक घरापर्यंत आरोग्याची सुविधा कशी जाईल ?  यासाठी त्यानी अहोरात्र प्रयत्न केल्यामुळे त्या आम्हा सर्व महिलांच्या आदर्श आहेत. त्याचे हे काम कायम स्मरणात राहणार असून त्यांनीच लोकसहभागातून विकासाची कामे कशी करावीत, याची दिशा जिल्हयाला दिल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनजंय रणदिवे म्हणाले की, मुधोळ – मुंडे यांनी पदभार स्विकारल्यापासून जिल्हयात विविध विकास कामाचा पट डोळया समोर ठेवून एक एक काम मार्गी लावल्यामुळे जिल्हयाच्या विकासात भर पडली आहे. त्यानी पदभार स्विकारल्यापासून आजपर्यंत सुटटी न घेता दीड महिन्याच्या चिमुकलीला सोबत घेवून विविध विकास कामे मार्गी लावले आहेत. अशीच कामे नुतन जिल्हाधिकारी दिवेगावकर यानी खंड न पडू देता करावीत व जिल्हयाचा विकासात्मक नाव लौकिक करावा असे आवाहन त्यांनी  केले. पत्रकार संघाच्यावतीने अध्यक्ष धनजंय रणदिवे, सचिव संतोष जाधव, सहसरचिटणीस राजाभाऊ वैद्य, संघटक मल्लिकार्जून सोनवणे, विनोद बाकले, अमजद सय्यद यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे वटवृक्षाचे रोपटे देवून स्वागत करण्यात आले. तर महसूल विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी मुधोळ - मुंडे यांना गणेश मुर्ती तर पत्रकार संघाच्यावतीने महालक्ष्मी - सरस्वती - गणपती मुर्ती देवून शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला. प्रस्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी शिरीष यादव यांनी व सुत्रसंचलान जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे यांनी तर आभार पत्रकार संघाचे सचिव संतोष जाधव यांनी मानले. या कार्यक्रमास महसूल, पोलीस, जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी, पत्रकार व निमंत्रित उपस्थित होते. यावेळी  विविध सामाजिक संघटना, शासकीय विभागाच्या अधिकारी यांच्यावतीने मुधोळ - मुंडे व दिवेगावकर यांचा सत्कार करण्यात आला.

 
Top