Views


कोरोना विषाणू संसर्गापासून बचावासाठी गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी -- स्त्री रोग प्रसुती  वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ.वसुधा दिग्गज दापके - देशमुख यांचे आवाहन

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
कोरोनामुळे गर्भवती महिलांना गर्भपात अथवा इतर समस्या निर्माण झाल्याच्या घटना अजुनतरी समोर आलेल्या नाहीत. तरीदेखील स्वतःला आणि गर्भातील बाळाला या संसर्गाची बाधा होणार नाही यासाठी नियमित स्वच्छता आणि योग्य ती खबरदारी घेणे खूप गरजेचे आहे. म्हणून कोरोना विषाणू संसर्गापासून बचावासाठी गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन उस्मानाबाद येथील सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्सच्या डॉ.वसुधा दिग्गज दापके - देशमुख यांनी केले आहे. कोरोना विषाणू संसर्गाने संपूर्ण जग हैराण झाले आहे. कोरोनाच्या वाढत्या विळख्यामुळे अनेकजणांना लागण होत असल्याचे दिसत आहे. अशा काळात वृद्ध व्यक्ती, बालके यांच्याबरोबर गर्भवती महिलांनी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. संसर्गापासून बचाव करण्यासाठी वारंवार हात धुण्याबरोबर सर्दी, खोकला असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. नियमित पौष्टिक आणि सकस आहार घेतल्याने रोगप्रतिकारशक्तीमध्ये वाढ होऊन संसर्ग टाळता येऊ शकतो. शिंक अथवा खोकला आल्यास तोंडाला रुमाल अथवा टिश्यूपेपर धरावा, वापरलेल्या टिश्यूपेपरची डस्टबिनमध्ये विल्हेवाट लावावी,  जेवणामध्ये प्रोटीन, जीवनसत्व, फॅटस्, कार्बोहायड्रेडस्, क्षार व पाणी याचा समतोल ठेवावा. मीठाचा वापर अगदी कमी असावा. त्याचबरोबर मसाल्यांचा वापरही कमी असणे गरजेचे आहे. 
त्याचबरोबर वेळोवेळी काही शंका अथवा परिस्थिती निर्माण झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. कोरोना संसर्गाची व्याप्ती लक्षात घेता आवश्यक ती खबरदारी घेण्याबरोबर वेळोवेळी डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि वैयक्तिकरीत्या काळजी घेतल्यास घाबरुन जाण्याचे कारण नाही. तरी देखील सर्दी, खोकल्याची लक्षणे असल्यास वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. 

*गर्भपाताची भीती अनाठायी!*
कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात गर्भवती महिलांमध्ये भीतीचे वातावरण अधिक आढळून येत आहे. कोरोनाची लागण झाल्यास गर्भपात होईल काय? अशी भीती अनेक गर्भवतींना वाटत आहे. परंतु आजपर्यंत कोरोना विषाणू संसर्गामुळे गर्भपात झाल्याचे एकही उदाहरण वैद्यकीय क्षेत्रात समोर आलेले नाही. त्यामुळे ही भीती अनाठायी आहे. परंतु वेळोवेळी काळजी घेणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधोपचार करणे गरजेचे आहे. 

सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये प्रसुती विनामूल्य - सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य नेहमीच करत आलेले आहे. सध्या कोरोना महामारी संकटाच्या काळातही हे कार्य सुरूच आहे. गत आठवड्यात बालकांच्या वैद्यकीय तपासणी मोफत केल्या होत्या. त्याचबरोबर गर्भवती महिलांची सिझेरियन शस्त्रक्रिया व सामान्य प्रसुतीही विनामूल्य करण्यात येत आहे. हॉस्पिटलमार्फत ही योजना 30 जुलै 2020 पर्यंत राहणार आहे. कोरोनाच्या संकटकाळात गरजू कुटुंबातील गर्भवती महिलांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्सच्या स्त्री रोग प्रसुती वंध्यत्व निवारण तज्ज्ञ  डॉ.वसुधा दिग्गज दापके - देशमुख यांनी केले आहे.
 
Top