*नळदुर्ग येथील पोलीस वसाहतीचे काम प्रगतिपथावर लवकरच मिळणार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काचं घर*
उस्मानाबाद/प्रतिनिधी
पोलीस वसाहतीचे काम प्रगतीपथावर असून 26 जानेवारी पर्यंत वसाहतीचे काम पूर्ण होऊन 4 अधिकार्यांसह 48 कर्मचाऱ्यांच्या राहण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर का होईना पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काचं घर मिळणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पोलिसांच्या राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून नळदुर्ग नगरपालिकेच्या वतीने सर्वे नंबर 236 मधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 लगत असलेल्या महामार्ग पोलीस ठाण्याच्या बाजूला पोलीस वसाहतीसाठी जागा आरक्षित ठेवण्यात आली होती. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस वसाहतीचा महत्त्वाचा प्रश्न शासन दरबारी लालफितीत अडकून रेंगाळत पडला होता. पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचे प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे ही बाब लक्षात घेऊन सन 2018 -19 मध्ये उस्मानाबाद चे तात्कालीन पोलीस अधीक्षकांनी पोलीस वसाहतीच्या कामाकरिता गृहमंत्रालयसह महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण खात्याकडे प्रस्ताव दाखल करून वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊन 52 घरांसाठी 9 कोटी 39 लाख 45 हजार 292 रुपये निधी शासनाकडून मंजूर झाला होता. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण खात्याच्या देखरेखीखाली धन स्मृति बिल्डकॉन कंपनी पुणे यांनी ठेका घेऊन 29 जून 2019 पासून पोलीस वसाहतीच्या कामाला सुरुवात केली होती. गेल्या 29 महिन्याच्या कालावधीमध्ये वसाहतीचे काम महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण खात्याचे वरिष्ठ अभियंता दिलीप बगळी, कनिष्ठ अभियंता कुणाल तानपिलेकर, स्पेस मॅजिक कन्स्ट्रक्शनचे अभियंता सरदार सय्यद , धन स्मृती बिल्डकॉन कंपनी चे वरिष्ठ अभियंता सरफराज अहेमद, विशाल बनकर, नितीन जाधव यांच्या देखरेखीखाली चांगल्या पद्धतीने होऊन जवळपास पूर्ण झाले आहे. आता केवळ रंगरंगोटी, खिडक्या व दरवाजाच्या काम सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या काही महिन्यांमध्ये वसाहतीचा काम पूर्ण होऊन नळदुर्ग पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांच्या राहण्याचा प्रश्न मिटणार आहे.