Views


     
    *जिल्हाधिकारी कार्यालयात व आवारात विना मास्क येणाऱ्यांना*
              *दंड करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती*
       
      
उस्मानाबाद /प्रतिनिधी

कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजना अंतर्गत ब्रेक द चैन अंतर्गत जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालय आणि कार्यालयांच्या आवारात अभ्यागतांसह कर्मचारी-अधिकारी यांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात विना मास्क कार्यालयात आणि कार्यालय आवारात विना मास्क येणाऱ्या अभ्यागतांना, कर्मचा ऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना विहित केलेला दोनशे रुपये दंड आकारुन वसुल करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी नामनिर्देशित अधिकाऱ्यांची नियुक्ती एका आदेशाद्वारे आज केली आहे.              
       राज्यातील सर्व शासकीय,निमशासकीय व खाजगी आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक केली आहे.कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पूर्ण करण्याबाबत तसेच मास्क अनिवार्य वापरावयाच्या दंड आकारणी शुल्काबाबत आदेश पारित केले आहेत. 
       महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व प्रकारच्या कार्यालयीन आस्थापनांनी दैनंदिन कामकाजादरम्यान मास्कचा सुयोग्य वापर तसेच लसीकरण पूर्ण करुन घेणे, यावर देखरेख करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून काही अधिकाऱ्यांची नामनिर्देशित आले आहे. 
        जिल्हाधिकारी कार्यालयातील विभागाचे नाव आणि नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांचे पद असे- जिल्हाधिकारी यांचे दालन व संलग्न परिसर-जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक तथा लघुलेखक,अपर जिल्हाधिकारी यांचे दालन व संलग्न परिसर- अपर जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक तथा लघुलेखक, महसूल विभाग- तहसीलदार (महसूल), जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे दालन, पुरवठा विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, विधी अधिकारी विभाग- सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांचे दालन आणि लगतचा परिसर, आवक जावक,लेखा व अ.ले.प. विभाग- तहसीलदार (सर्वसाधारण), पुनर्वसन विभाग- मंडळ अधिकारी, पुनर्वसन विभाग. 
         सामान्य प्रशासन विभाग- नायब तहसीलदार (सा. प्र.), आस्थापना विभाग- नायब तहसीलदार (आस्थापना), भूसंपादन समन्वय- नायब तहसीलदार (भूसंपादन समन्वय). निवडणूक विभाग- नायब तहसीलदार (निवडणूक), एन.आय.सी. विभाग- अतिरिक्त जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी, नियोजन विभाग- जिल्हा नियोजन अधिकारी, रो.ह.यो. विभाग- नायब तहसीलदार (रो.ह.यो.), न.पा.प्र. विभाग- जिल्हा प्रशासन अधिकारी, न. पा. प्र, भूसंपादन मांजरा प्रकल्प विभाग- मंडळ अधिकारी, भूसंपादन मध्यम प्रकल्प विभाग- मंडळ अधिकारी.
        या नामनिर्देशित सक्षम प्राधिकारी यांनी पुढीलप्रमाणे कार्यवाही करावयाची आहे- आपणांस नेमून दिलेल्या विभागातील कार्यरत अधिकारी,कर्मचारी तसेच विभागात कामकाजास्तव येणाऱ्या सर्व अभ्यागतांनाही विभाग आणि विभागाच्या आवारात नाक तसेच तोंड पूर्णत: झाकले जाईल अशा पद्धतीने मास्क वापरणे बंधनकारक राहील.आपणांस नेमून दिलेल्या विभागातील कार्यरत अधिकारी,कर्मचारी यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झाल्याची खातरजमा करावी. कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाल्याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित अधिकारी ,कर्मचाऱ्यांकडून प्राप्त करुन घ्यावे.
      ज्या कर्मचाऱ्यांचे लसीकरणासाठी काही अडचण असल्यास त्याबाबतची माहिती घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याकडे सादर करावी. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी संबंधित सर्व विभागांकडून प्राप्त माहितीनुसार नजीकच्या लसीकरण केंद्रात किंवा सार्वजनिक आरोग्य विभागात संपर्क करुन कार्यालयीन अधिकारी ,कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाचे विशेष सत्र आयोजित करावे, जेणेकरुन सर्व अधिकारी ,कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण होईल याची खातरजमा करावी.सर्व कार्यालय आणि कार्यालयाच्या आवारात अभ्यागतांसह मास्कचा वापर अनिवार्य करण्यात येत असल्याने विनामास्क वावरणाऱ्या अभ्यागत, कर्मचारी, अधिकारी यांना संबंधित अभ्यागत, कर्मचारी, अधिकारी ज्या विभागाच्या क्षेत्रात,आवारात विनामास्क आढळला त्या विभागाच्या नामनिर्देशित अधिकारी दंड करण्यास सक्षम प्राधिकारी राहील. 
              नामनिर्देशित सक्षम प्राधिकारी यांनी विनामास्क आढळणाऱ्या अभ्यागत,कर्मचारी, अधिकारी यांना रक्कम दोनशे रुपये फक्त इतका दंड आकारणी करुन त्याबाबतची पावती द्यावी. नामनिर्देशित सक्षम प्राधिकारी सदर दंडाची रक्कम संबंधित विभागाच्या आहरण व संवितरण अधिकाऱ्याकडे जमा करेल आणि आहरण व संवितरण अधिकारी त्या दंडाची रक्कम पुढील नमूद केलेल्या लेखाशीर्षाखालील असलेल्या जमा सांकेतांकाखाली भरणा करेल.महसूल जमा-(सी) इतर कराव्यतिरिक्त महसूल-(एक) सर्वसाधारण सेवा-0070 – इतर प्रशासनिक सेवा-800 इतर जमा रक्कम.
                                     
 
Top