*लोहारा तालुक्यातील पीक नुकसानीचे पंचनामे सुरु*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
लोहारा तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा भरलेला आहे. अशा शेतकऱ्यांनी बजाज अलायंझ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीकडे ऑनलाईन पध्दतीने तक्रारी दाखल केलेल्या आहेत. अशा शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे कृषी विभाग व विमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त माध्यमातून करण्याचे काम दि. 26 सप्टेंबरपासून सुरु करण्यात आले आहे. तालुक्यातील तोरंबा येथे तालुका कृषी अधिकारी मिलिंद बीडबाग यांनी पीक विमा सर्वेक्षण पाहणी केली. यावेळी सास्तूरचे मंडळ कृषी अधिकारी प्रदीप भोसले, कृषी सहाय्यक गायकवाड किशोर, विमा कंपनी प्रतिनिधी जाधव, शेतकरी बळीराम बाबूराव रणखांब, रवींद्र बाबुराव रणखांब उपस्थित होते.
लोहारा तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान या पावसामुळे झालेले आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे विमा भरलेला आहे. अशा शेतकऱ्यांनी लेखी किंवा ऑनलाईन तक्रार विमा कंपनीकडे स्वतः किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून दाखल करावी. तसेच पीक विमा संदर्भात तक्रार दाखल किंवा पंचनामे करीत असताना कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी Bajaj Allianz GIC Ltd टोल फ्री क्र.18002095959 या क्रमांकावर किंवा PMFBY central govt kisan टोल फ्री क्रमांक 18001 801551 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच http:// bit.ly/312ekvl किंवा केंद्र शासनाचे PMFBY crop insurance ॲप डाऊनलोड करुन वरील लिंक वापरून फार्म मित्र ऍप डाऊनलोड करून https://play. google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central या लिंकवर आपल्या पीक नुकसानीच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी कराव्यात. जर पीक नुकसानीची ऑनलाईन तक्रार होत नसेल तर ऑफलाईन पद्धतीने देखील तक्रार दाखल करता येते. त्यासाठी लोहारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौका जवळील गोरे कॉम्प्लेक्समधील गाळा क्र.३ मध्ये असलेल्या बजाज अलायंझ जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात रीतसर लेखी तक्रार नोंदवावी. तसेच आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे लेखी तक्रार नोंदवावी.
तसेच ई पीक पाहणी या अँप वर पीक पेरा माहिती नोंदविणे आणि विमा कम्पनी कडे तक्रार नोंदविणे या दोन्ही भिन्न बाबी असून त्या दोन्ही बाबी या स्वतंत्रपणे ऑनलाईन नोंद करून घेणे आवश्यक आहे.
पीक विमा रक्कम भरलेल्या पावतीसह तक्रार नोंदणी आवश्यक - बिडबाग
अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीनचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत रक्कम भरून विमा कवच प्राप्त केले आहे. प्रक्षेत्रावर पंचनामे करीत असताना विमा कंपनी प्रतिनिधी सोबत कृषी सहाय्यक उपस्थित असणे आवश्यक आहे. त्यावेळी शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या कोऱ्या प्रपत्रावर स्वाक्षरी करू नये. तसेच पीक नुकसानीची तक्रार पीक विमा रक्कम भरलेल्या पावतीसह विमा कंपनीकडे शक्यतो ऑनलाईन पद्धतीने नोंदऊन तक्रारीचा सूचना क्रमांक प्राप्त करून घेण्यास प्रथम प्राधान्य द्यावे, असे आवाहन लोहारा तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी केले आहे.