Views*सारोळ्यातील पाच रस्त्यांना ग्रामीण मार्ग क्रमांक मिळणार; परिपूर्ण प्रस्ताव तयार!*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

शेतकरी अन् ग्रामस्थांची रक्तवाहिणी समजल्या जाणाऱ्या व दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना ग्रामीण मार्ग क्रमांक मिळण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव अखेर तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता यांच्या स्वाक्षरीने मंत्रालयातील बांधकाम विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात सारोळा शिवारातील तब्बल ५ रस्त्यांना ग्रामीण मार्ग क्रमांक मिळणार असून रस्ता डांबरीकरणाचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी दिली. सारोळा येथील बहुतांशी रस्त्यांची अवस्था बिकट आहे. शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना या मार्गावरून वाहतूक करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच हे रस्ते कोणत्याही कृती आराखड्यात नसल्याने रस्ता काम करण्यासाठी अडचणी येत आहेत. तसेच निधी मिळत नसल्याने वर्षेनुवर्षे रस्त्याचे प्रश्न प्रलंबित राहत आहेत. हे रस्ते करण्याची शेतकऱ्यांसह ग्रामस्थांकडून वारंवार मागणी होत असून तत्काळ कृती आराखड्यात या रस्त्यांना ग्रामीण मार्ग क्रमांक देण्याचे निर्देश आ. कैलास घाडगे-पाटील यांनी मुख्य कार्यकारी अभियंत्यांना दिले होते. तसेच सरपंच प्रशांत रणदिवे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनीही यासाठी पाठपुरावा केला आहे. त्यानंतर या रस्त्यांना ग्रामीण मार्ग क्रमांक देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सारोळा ग्रामंपचायत सदस्य विनोद बाकले यांनी रस्त्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे संबंधित विभागाकडे दाखल केली असून शाखा अभियंता मैंदाड यांनी प्रस्ताव तयार केला आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता यांच्या स्वाक्षरीने हा परिपूर्ण प्रस्ताव थेट मंत्रालयात मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात या रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळणार असून सर्व रस्त्याचे डांंबरीकरण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची मोठी अडचण आता दूर होणार आहे.
या रस्त्यांना मिळणार क्रमांक
* शहाजी झोंबाडे यांचे शेत ते जुना बेंबळी रस्ता
* उस्मानाबाद-औसा रस्ता ते दारफळ जोड रस्ता
* सारोळा-मेडसिंगा रस्ता ते जुना बेंबळी रस्ता
* सकनेवाडी जुनी वाट ते मसोबा मंदीर रस्ता
* उस्मानाबाद-औसा राज्य मार्ग ते मेडसिंगा चिखली-रस्ता (गुळ फॅक्टरी)
 
Top