Views

*जिल्ह्यात शेतरस्त्याचा सारोळा पॅटर्न आदर्शवत;
 २२ किमीचे २१ रस्ते झाले तयार! शासनाचा एक दमडीचाही निधी न घेता कामे! शेतकऱ्यांच्या लोकवर्गणी व लोकसहभागातून रूपडे पालटले! शेतकऱ्यांच्या शेतीतून रस्ते; लोकवाट्यापोटी दिले १७ लाख रूपये! शेतरस्त्याच्या मातीकामासह मजबुतीकरणही पूर्ण! पाच गावात राबला सारोळा पॅटर्न; भरपावसाळ्यातही शेतात जाणे झाले सुकर!
रस्त्याच्या मजुबतीकरणासह खडीकरणासाठी 
आता प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज!*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
 
शेत रस्ते अन् बांध म्हटले की वाद-विवाद आणि भांडण-तंटे आलेच. मग पोलीस स्टेशन आणि न्यायालयापर्यंत प्रकरणे जातात. मानसिक त्रास आणि आर्थिक नुकसान हे ठरलेलेच. मात्र शेतकऱ्यांनी एकजुट केल्यास कसे सकारत्मक चित्र उभे राहू शकते, याचा प्रत्यय सारोळा (बु. ता.उस्मानाबाद) येथे आला आहे. सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले या तरूणाने गावातील सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून समन्वयातून आणि लोकसहभागातून 'शेत तिथे रस्ता' मोहिम राबविली असून ती यशस्वीही करून दाखविली आहे. आतापर्यंत सारोळासह परिसरातील पाच गावात २२ किमी लांबीच्या तब्बल २१ रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सारोळा गावातून सुरू झालेला हा शेतरस्त्याचा नवा पॅटर्न आता परिसरातील गावातही राबविला जात आहे. विशेष म्हणजे रस्ता कामासाठी शासनाचा एक दमडीचाही निधी न घेता शेतकऱ्यांच्या वर्गणीतून जवळपास १७ लाख रूपये खर्चून हे रस्ते साकारण्यात आले आहेत. ना सातबारावर हे रस्ते होते ना नकाशावर! केवळ शेतकऱ्यांची एकजुट आणि सहमतीमधून नव्या रस्त्याची निर्मिती झाली असून जिल्ह्यात शेतरस्त्याचा सारोळा पॅटर्न निर्माण झाला आहे. शेतरस्ता म्हटले की, वाद-विवाद, तंटेच नव्हे तर हाणामाऱ्यापर्यंत प्रकरण पोहचते. त्यानंतर मग पोलीस स्टेशन आणि कोर्टाच्या पायऱ्या चढण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. मग 'तारीख पे तारीख' चा सिलसिला सुरू होते. प्रशासनाच्या 'कागदी' मेळात शेतरस्त्याची प्रकरणे अडकली जातात. शेतात बैलगाडी, ट्रॅक्टर, ऊसाची वाहने तर सोडाच पण धड पायवाटही राहत नसल्याने वर्षेनुवर्षे शेतकऱ्यांची गैरसोय सुरू आहे. सारोळा (बुद्रूक ता. उस्मानाबाद) येथे सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी शेतकऱ्यांना सोबत घेवून शिवारातील शेतरस्ते करण्याची मोहिम हाती घेतली. पहिल्यांदा एक तीन किमी लांबीच्या रस्ता कामास सुरूवात करण्यात आली. अवघ्या काही दिवसात या रस्त्याचे मातीकाम पूर्ण झाले. त्यानंतर दुसरा रस्ता सुरू करण्यात आला. बघता-बघता एकट्या सारोळा गावात ९ रस्त्याची कामे पूर्ण झाली. त्यानंतर ही मोहिम परिसरातील काजळा, वाघोली, चिखलीसह टाकळी (बें) या गावातही राबविण्यात आली. आतापर्यंत या पाच गावात २२ किमी लांबीचे तब्बल २१ रस्ते तयार झाले आहेत. यातील अनेक रस्त्याचे मातीकाम व मजबुतीकरणही शेतकऱ्यांच्या लोकवर्गणीमधूनच करण्यात आले आहे. या रस्ताकामावर जवळपास १७ लाख रूपयांचा खर्च झाला असून हा सर्व खर्च शेतकऱ्यांच्या लोकवाट्यामधून करण्यात आला आहे. यासाठी शासनाचा एक दमडीचाही निधी घेण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या थेट शेतामधून हे रस्ते साकारण्यात आले आहेत. दोन्ही बाजुच्या शेतकऱ्यांना विश्वासात घेवून रस्त्याची मोहिम यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. ज्या ठिकाणी साधी पाऊल वाटही नव्हती, त्याठिकाणी आता १५ फुट रूंदीचे रस्ते तयार झाले आहेत. शेतामध्ये ट्रॅक्टर, बैलगाडीसह इतर वाहनेही आता घेवून जाणे सोयीस्कर झाले आहे. स्वत: जमिन आणि लोकवाटा देवून शेतकरीही रस्ते तयार करू शकतात, हे शेतकऱ्यांनीच दाखवून दिले आहे. शेतरस्त्याचा हा सारोळा पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यात राबविल्यास शेतकरी सुजलाम्-सुफलाम् होण्यास वेळ लागणार नाही. आता या शेतरस्त्याच्या मजबुतीकरणासह खडीकरणासाठी शासन आणि प्रशासनाने पुढाकार घेवून शेतरस्त्याच्या चळवळीस बळ देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे.
न्यायालयातील वादही मिटले!
शेतरस्त्यासाठी अनेक शेतकऱ्याचे न्यायालयात वाद सुरू होते. मात्र हे रस्ते तयार झाल्याने हे वादही आता कायमस्वरूपी संपुष्टात आले आहेत. जे शेतकरी रस्ते, बांधावरून वाद-विवाद आणि भांडण करते होते, ते आता रस्ता झाल्याने गुण्या-गोविंदाने राहत असल्याचे आदर्शवत चित्र पहावयास मिळत आहे.
.....................................
जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला 'बळीराजा'चे बळ!
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची मोहिम सुरू केली आहे. हजारो शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत. तसेच शेतरस्त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. याला सारोळासह परिसरातील शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद देत रस्ते अतिक्रमणमुक्त तर केलेच पण नव्या शेतरस्त्याचीच निर्मिती करून नवा आदर्श उभा केला आहे.
......................................
आता शासनाने पुढाकार घ्यावा
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची शेतरस्त्याची मोहिम बघूनच शेतरस्त्याचा सारोळा पॅटर्न सुरू करण्यात आला. परिसरातील गावातही हा पॅटर्न आता यशस्वी ठरला आहे. केवळ पाच गावात २१ शेतरस्त्याची कामे पूर्ण झाली आहेत. शेतकऱ्यांनी स्वत: जमिनीतून रस्ते करण्यास सहमती दिलीच, शिवाय काम करण्यासाठी लाखो रूपयांचा लोकवाटाही गोळा करून दिला. त्यामुळेच शेतरस्त्याची चळवळ यशस्वी होवू शकली. जवळपास १७ लाख खर्चून कामे पूर्ण करण्यात आली. आता शासन आणि प्रशासनाने या रस्ता कामाच्या मजबुतीकरणासह खडीकरणासाठी विशेष निधी देवून शेतरस्ता चळवळीस बळ देण्याची गरज आहे, असे विनोद बाकले, ग्रामपंचायत सदस्य सारोळा यांनी सांगितले.
 
Top