Views




*उस्मानाबाद चाईल्ड-लाईन च्या तत्परतेमुळे लोहारा तालुक्यातील सास्तूर येथे होणारा बालविवाह वेळीच रोखला*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील सास्तूर येथे होणारा बालविवाह चाईल्ड - लाईन उस्मानाबाद यांच्या सतर्कतेमुळे आणखी एक बालविवाह रोखण्यात यश आले आहे. उस्मानाबाद चाईल्ड-लाईन कार्यालयात आलेल्या इ-मेलच्या आधारे हा बालविवाह उघडकीस आला असून ग्रामीण भागात बालविवाहाचे प्रमाण वाढत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा समोर आले आहे. चाईल्ड-लाईन उस्मानाबाद मार्फत पुढील कार्यवाहीसाठी अल्पवयीन मुलीस बाल कल्याण समितीसमोर हजर केले असता तिची रवानगी शासकीय बालगृह (मुलींची) येथे करण्यात आली आहे. उस्मानाबाद येथील चाईल्ड-लाईन (1098) ला सोलापूर चाईल्ड-लाईन कडून एक इ-मेल 26 मे 2021 रोजी दुपारी 1.30 वाजता प्राप्त झाला. त्यामध्ये सास्तूर (ता.लोहारा) येथे बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाली. बालविवाहाची घटना वेळीच रोखण्यासाठी उस्मानाबाद चाईल्ड-लाईनचे संचालक डॉ.दिग्गज दापके - देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाईल्ड - लाईनचे समन्वयक ज्ञानेश्वर गिरी, टीम मेंबर रविराज राऊत, सौ. वंदना कांबळे हे सास्तूरकडे रवाना झाले. सास्तूर येथे पोहचल्यानंतर सास्तूर आऊट पोस्टचे पोलीस कर्मचारी साखरे व सांगवे यांना घेऊन चाइल्ड - लाइनची टीम ग्रामपंचायत कार्यालयात पोहचली. तेथे सरपंच यशवंत कासार, ग्रामसेवक डि.आय‌.गोरे यांनी अल्पवयीन मुलगी व तिच्या आई - वडिल व नातेवाईकांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलावून घेतले. चाईल्ड - लाईन च्या टीमने मुलीच्या आई - वडिलांना बालविवाहामुळे मुलीच्या आयुष्याचे नुकसान याबाबत माहिती देऊन समुपदेशन केले. तसेच मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय विवाह करणार नसल्याचे हमीपत्र त्यांच्याकडून लिहून घेऊन बालकल्याण समिती उस्मानाबाद येथे हजर राहण्यास कळविण्यात आले. दरम्यान दि. 27 मे 2021 रोजी बाल कल्याण समिती उस्मानाबाद येथे बाल कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ.ए.डी.कदम, सदस्य नंदकिशोर कोळगे, कैलास मोटे, अ‍ॅड.श्रीमती आशा गोसावी यांनी मुलीचे व तिच्या नातेवाईकांचे योग्य ते समुपदेशन करुन समज देण्यात आली.
--------------------------------------------------------------------
“कोरोना लॉकडाऊनच्या काळात विशेषतः ग्रामीण भागात बालविवाहाचे प्रमाण वाढल्याचे उस्मानाबाद चाईल्ड-लाईन ने आतापर्यंत केलेल्या अनेक कार्यवाहीमुळे समोर आलेले आहे. कमी खर्चामध्ये विवाह समारंभ उरकले जात असले तरी अल्पवयीन मुलीच्या माता-पित्यांनी बालविवाहामुळे भविष्यात मुलीच्या आरोग्याच्या होणार्‍या नुकसानीचे भान ओळखले पाहिजे. आपल्या आजूबाजूस कुठे बालविवाह होत असल्यास जागरुक नागरिकांनी तात्काळ चाईल्ड - लाईन उस्मानाबादच्या '1098" या टोल फ्री क्रमांकावर तात्काळ संपर्क साधून माहिती द्यावी.” असे आवाहन डॉ. दिग्गज दापके-देशमुख संचालक, चाइल्ड - लाइन उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top