Views


*कोरोना विषाणूंची साखळी खंडीत करण्यासाठीच प्रत्येकांनी गांभीर्याने घेणे अत्यावश्यक -- नायब तहसीलदार खोंदे*

उस्मानाबाद/प्रतिनिधी 

कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी नागरीकांनी गांभीर्याने घेतले नसल्यामुळे प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. त्यामुळे वृद्धांसह तरुण व धडधाकट असणाऱ्यांचे प्राण जात आहेत. यासाठी गेल्या वर्षभरापासून आपण कोरोनाचा सामना करीत आहोत. मात्र आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सांगितलेल्या उपायांकडे नागरीकांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यामुळे या विषाणूंचा प्रादुर्भाव शहरांसह ग्रामीण भागात झपाट्याने मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी कोणत्याही परिस्थितीत खंडित करण्यासाठीच प्रत्येकांनी दक्षता व काळजी घेणे महत्त्वाचे व अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन नायब तहसिलदार मुस्तफा खोंदे यांनी दि.14 मे 2021 रोजी केले. उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव येथे राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीच्यावतीने 50 खाटांचे शरदचंद्रजी पवार ग्रामीण कोविड आयसोलेशन केअर सेंटरचे उद्घाटन नायब तहसिलदार मुस्तफा खोंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अध्यक्ष अरुण निटुरे, मंडळ अधिकारी व्ही.व्ही. काळे, सरपंच अमोल पाटील, ताकविकीचे सरपंच अहेमद पठाण, चंद्रकला निटुरे, अजिंक्य निटुरे, प्रतिक्षा निटुरे, सुरेश बामनकर, नंदू पवार, तलाठी जी.के. कोळी, आरोग्य कर्मचारी एस.एम. बोरेवाल, व्ही.टी. कस्पटे, आदी उपस्थित होते. पुढे बोलताना नायब तहसिलदार खोंदे म्हणाले की, कोरोना होऊ नये यासाठी नागरिकांनी तोंडाला मास्क बांधणे, सतत स्वच्छ पाण्याने हात धुणे, वारंवार सॅनिटायझरचा वापर करणे व सामाजिक अंतर सुरक्षित राखणे, गर्दी न करणे किंवा गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यंत गरजेचे व महत्वाचे बनले आहे. विशेष म्हणजे ज्या भागात व गावात या नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या ठिकाणी कोरोना विषाणूंचा प्रसार झालेला नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी कोरोनाची कोणतीही सौम्य लक्षणे दिसता क्षणी तो आजार अंगावर न काढता कुठल्याही प्रकारच्या समाजिक दबावाला बळी न पडता त्यांनी थेट जवळच्या रुग्णालयात जाऊन औषधोपचार घ्यावेत. त्याबरोबरच घरी शक्य असल्यास होम क्वॉरन्टाईन व्हावे अथवा शासनाच्या तसेच सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या कोविड आयसोलेशन केअर सेंटरमध्ये दाखल होऊन योग्य तो औषधोपचार घेऊन यावर मात करावी, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. तर अरुण निटुरे म्हणाले की, या केंद्रांमध्ये येणाऱ्या रुग्णांसाठी योग्य औषधोपचार मिळण्यासह सकस आहार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील रुग्णांनी कोरोना हा अंगावर आजार न काढता या सेंटरमध्ये दाखल होऊन औषधोपचार घेऊन स्वतःसह कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. तर अशोक चव्हाण यांनी जसा आपण विचार करतो त्याप्रमाणे आपले आयुष्य घडणार आहे. त्यामुळे तणावमुक्त राहण्याचा प्रत्येकांनी प्रयत्न केल्यास हा आजार लवकरात लवकर बरा होऊ शकतो असे सांगितले. यावेळी केशेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका, आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविका यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
-----------------------------------------------------------------------
18 गावातील नागरिकांची होणार सोय
केशेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत 18 गावे येत असून या परिसरातील रुग्णांना या‌ कोविड आयसोलेशन केअर सेंटरच्या माध्यमातून आरोग्य सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
 
Top