Views
*शेतरस्त्याचा सारोळा पॅटर्न आता काजळ्यात; पाच कामे पूर्ण, लोकसहभागातून रूपडे पालटले!*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

शेतरस्त्याची मोहिम काजळा गावात यशस्वी
लोकसहभागातून कामे; मातीकामासह मजबुतीकरणही पूर्ण शेतकऱ्यांसह गाव पुढाऱ्यांचा पुढाकार कामी! वर्षानुवर्षाची कटकट शेतकऱ्यांनीच कायमची मिटविली! उस्मानाबाद: शेतकऱ्यांनी आणि गाव पुढाऱ्यांनी मनावर घेतले तर काय होऊ शकते याचे ज्वलंत उदाहरण काजळा (ता. उस्मानाबाद) येथे पहावयास मिळत आहे. शेतरस्त्याचा सारोळा पॅटर्नची प्रेरणा घेऊन काजळा गावातील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून शेत रस्त्याची मोहीम हाती घेऊन ती यशस्वीपणे पूर्ण केली आहे. आतापर्यंत पाच रस्त्याची कामे पूर्ण करण्यात आली असून मातीकामासह मजबुतीकरणही करण्यात आले आहे. गाव तिथे शेतरस्त्याची जटील समस्या उभी राहतेच. वर्षेनुवर्षे बांध आणि शेतरस्त्यावरून वाद-विवाद आणि मग पोलीस स्टेशन, कोर्टाच्या पायऱ्या चढण्याची वेळ येते. उत्पन्नापेक्षा रस्त्याच्या वादामुळेच अधिक खर्च व्हायचा. हीच कटकट कायमस्वरूपी मिटविण्यासाठी काजळा गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतरस्त्याचा सारोळा पॅटर्न राबविण्याची ठरविले. अवघ्या काही दिवसात शेतकऱ्यांचा लोकसहभाग आणि वर्गणीतून मोहिमेस सुरूवात करण्यात आली. बघता-बघता पाच शेतरस्त्याची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. केवळ मातीकामच नव्हे तर मजबुतीकरणही शेतकऱ्यांनी केले आहे. यासाठी शासन-प्रशासनाचा एक दमडीचाही निधी न घेता ही कामे सुरू आहेत. आतापर्यंत पाच रस्त्याची कामे पूर्ण झाली असून सहाव्या रस्त्याचे कामही सुरू करण्यात येणार आहे. तसेच जवळपास २० रस्ते करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या रस्ता कामास सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी शनिवारी (दि.८) भेट देवून शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच शेतकऱ्यांना सर्वोत्पर मदत व मार्गदर्शन करण्याची ग्वाही दिली. शेतरस्त्याची मोहिम यशस्वीपणे राबविण्यासाठी सरपंच प्रविण पाटील, उपसरपंच चंद्रकांत मडके, रामचंद्र कदम, मनोज कदम, प्रमोद कदम, दादा शेळके,अविनाश शेळके, विकास राऊत, अमोल मडके, प्रशांत कदम, बाबुराव मडके, दादा धामणे, फुलचंद धामणे, अमोल कदम, विशाल राऊत, सागर शेळके, अनिल भोसले, करण शेळके आदींसह शेतकरी परिश्रम घेत आहेत. 
----------------------------------------------------------------------
शेतकऱ्यांना सहकार्य करणार
सारोळा पॅटर्नची प्रेरणा घेवूनच काजळा गावातील शेतकऱ्यांनी शेतरस्त्याची मोहिम हाती घेतली आहे. अत्यंत दर्जेदार शेतरस्त्याची कामे करण्यात आली असून मातीकाम व मजबुतीकरणही शेतकऱ्यांनी स्वखर्चातून केले आहे. शेतरस्ते करणे ही सोपी बाब नाही. मात्र शेतकऱ्यांनी यावर मात करत मोहिम यशस्वीपणे राबविली आहे. शेतकऱ्यांना काही अडचण आली तर त्यांना सर्वोत्परी मदत व सहकार्य करणार असल्याचे सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी सांगितले.
 
Top