Views


 *"कित्येक दिवस झाले चुली पेटल्याच नाहीत,सरणं इजलीचं नाहीत " -प्रा.डॉ.तुळशीराम उकिरडे*

कळंब:-

कोरोना या महाभयंकर महामारीने जवळपास जगभरातील सर्वच देशात थैमान घातले आहे.महासत्ताक असणारी अमेरिका,इटली,इंग्लंड,स्पेन,जर्मनी,रशिया ही राष्ट्रे मेटाकुटीला आली.कधी नव्हे एवढी सामाजिक,राजकीय,आर्थिक,सांस्कृतिक,शैक्षणिक क्षेत्रात पिछेहाट झाली . त्याचबरोबर प्रचंड जीवित हानी झाली आणि आजही होत आहे , हे दुर्दैवी चित्र जगभर पहावयास मिळत आहे .भारतात,महाराष्ट्रात झाडांना गळती लागल्यासारखी माणसांची पानगळ होते आहे. हे भोवतालचं विदीर्ण दृश्य पाहून मन सुन्न झालं .दररोज कोणाचा बाप,कोणाची माय,कोणाचा भाऊ,कोणाची बहीण,कोणाचा मामा,कोणाचा मित्र , कोणता विद्वान गेल्याची बातमी कानी येतेय ; तर कोणाचं अख्ख कुटुंब उध्वस्त झाल्याचं ऐकायला मिळतंय .ज्यावेळी एखाद्या घरातील कर्ता जातो त्यावेळी त्याच्या किती वेदना त्या कुटुंबाला सोसाव्या लागतात याची जाणीव आपणा सर्वांना आहेच .आज घरं उध्वस्त होताहेत .कोणाचं पालकत्व हरवलं जातंय .सामाजिक घडी विस्कळीत झाली आहे . या महामारीतून गरीब - श्रीमंत ,लहान - थोर असं कोणीही सुटलं नाही.कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर काही प्रमाणात शिथिलता निर्माण झाली .जनजीवन, व्यवहार पूर्वपदावर आल्यासारखं वाटू लागलं होतं .त्यावेळी दुसऱ्या लाटेनं सर्वदूर भयानक अक्राळ विक्राळ रूप धारण केलं. पहिल्या लाटेची झळ महानगरात ,नगरात मोठया प्रमाणात बसली होती . त्यातून आपण सावरत होतो . कोरोनाची दुसरी लाट शहरापासून वाड्यावस्तीवर जाऊन पोहचली . गावामध्ये एखादी व्यक्ती मृत्यू पावली तर संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करायचं , दुखवटा पाळायचं .दहावा,बारावा व्हायचा . नातेवाईक येऊन जायचे .आस्थेने विचारपूस करायचे . थोडंतरी दुःख कमी व्हायचं .आज रक्ताच्या नात्यातील माणसं सोडून जाताहेत . घरातून बाहेर पडणं शक्य नाही .ज्या घरातील व्यक्ती गेला त्याच घरात दुखवटा . शेजारी पाजारी घरी जाऊन सांत्वनही करू शकत नाहीत .कोणाच्या घरी दुःखद घटना घडली की शेजारची लोकं चहा पाणी ,भाजी भाकरी घेऊन यायची .आज कोणत्या परिस्थितीतून आपण जातोय ? खरंच मरण एवढं स्वस्त झालं आहे ? दुःख,वेदना,आक्रोश,विवंचना, हतबलता ,निराशा यामध्ये मती गुंग झाली . कित्येक घरात चुली पेटल्याच नाहीत , कित्येक दिवस झाले स्मशानातील सरणं विझलीच नाहीत.कधीतरी स्मशानाकडे जाणारं एखादं प्रेत दिसायचं . हळहळ वाटायची . मृत्यू ही गोष्ट मनातही येत नव्हती .आज दिवसातून अनेक वेळा मृत्यू हा शब्द उच्चारला जातोय . कधी नव्हे ते विपरीत घडतंय.
   शासन , प्रशासन , आरोग्य यंत्रणेचे नियोजन या महामारीत कोलमडून गेलेले . दररोज प्रचंड वाढणारी कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या आणि आरोग्य यंत्रणेवर वाढणारा ताण आत्मचिंतन करायला लावणारा आहे .भारत जगातील लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील दुसऱ्या क्रमांकावर असणारा विकसनशील देश . सर्वदूर मृत्यूच्या बातम्या . आपलीच जवळची माणसं सोडून जाताहेत .आम्ही पाहण्याशिवाय काहीही करू शकत नाही . आज आजारी माणसांच्या वेदना दुरूनच विचारायच्या . जवळ बसून विचारपूस करणारी आई ,आजी नाही . मायेनं पाठीवरून हात फिरवणारं कोणी नाही.जेवलास का ? गोळ्या घेतल्यास का ? गरम पाणी पिलास का ? वेळेवर जेवण घेतोस का ? हे सर्व दूरवरून विचारायचं . किती सोसायचं ? आपल्याच माणसांना आज आपण परके झालो आहोत . कोरोना आणि त्याचे परिणाम प्रत्येकजण अनुभवत आहे .
 टीव्ही , मोबाईल,फेसबुक,वर्तमानपत्र पाहिलं की भारताचं भयावह आणि शोकात्म रूप नजरेला पडत आहे . हे थांबायला हवं .
कालपर्यंत कोठेतरी एखादा व्यक्ती positive आला ही बातमी हद्दपार झाली . हजारोंच्या संख्येने वाढत जाणारे आकडे , ग्रामीण भागामध्ये प्रचंड प्रमाणात वाढणारी रुग्णांची संख्या चिंताजनक आहे .असं एखादं गाव नाही की तिथं कोरोना पोहचला नाही . एखादी दुःखद घटना घडली नाही . स्मशानातील रांगा पाहवत नाहीत . या महामारीत राजकारणी,सिनेकलावंत,डॉक्टर,नर्स,पोलीस,प्राध्यापक,शिक्षक,वकील,शेतकरी यांचा बळी गेला . बेडची अपुरी संख्या,रेमडीसीवर इंजेक्शनचा तुटवडा ,ऑक्सिजन अभावी तडफडून मरणारी सोन्यासारखी माणसं . या महामारीत हतबल झालेला मानव याची देही याची डोळा आम्ही दररोज पाहतो आहोत . गेल्या दोन - तीन दशकात कधी नव्हे ती विकासाच्या नावाखाली प्रचंड वृक्षतोड केली गेली , करण्यात आली . त्यावेळी आम्ही फक्त बघ्याची भूमिका घेतली .शेतातील बाभळीची डागवडं,आंब्याची आंबराई नष्ट केली .रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली रस्त्या लगतच्या प्रचंड महाकाय झाडांची कत्तल केली गेली . झाडासोबत हवेतील ऑक्सिजन ही कमी झाला . याचा प्रत्यय आज आम्ही अनुभवतो आहोत . झाडे लावायचा आम्हाला विसर पडला .आम्ही बघे झालो ,आम्हाला विकास हवा होता ,आम्हाला चांगला रस्ता हवा होता .पण जगण्यासाठी ऑक्सिजनचा विचार आम्ही केला नाही .औद्योगिक वसाहती , शहरीकरणाच्या , प्रगतीच्या नावाखाली मोठमोठे जंगल नष्ट केले . प्रचंड प्रदूषण वाढलं .आज माणूस ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे तडफडून मरत आहे . हा आत्मचिंतेचा विषय प्रत्यक्ष अनुभवत आहोत . आपण प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत,जोपासली पाहिजेत ,त्याचं संवर्धन केलं पाहिजे, किमान उद्याच्या पिढीसाठी तरी. आज माणसं वाचवण्यासाठी आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्नही करत आहेत .तरीही ऐन उमेदीतील ,नामवंत अवतीभवतीची माणसं कायमची सोडून जात आहेत . ही सल अंतर्मनाला छेदून जाते आहे . आम्ही आतातरी सुधारणार आहोत का ? यातून काही बोध घेणार आहोत का ? आम्हाला पैसा हवा की जीवन? की आपली प्रिय माणसं ? आम्ही एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा अखंड मानव जातीला तारण्यासाठी सर्वांनी पुढं यायला हवं . त्यातच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे . आपण सर्वांनी सजग आणि सावध रहायला हवं . काळ कठीण आहे . शत्रू अज्ञात आहे . आम्हाला शास्त्रज्ञ,वैज्ञानिक , आरोग्य यंत्रणा यावर विश्वास ठेवावाच लागेल .कोरोनाचं राजकारणही बरंच झालं.कोरोनाच नाही,हा जागतिक स्टंट आहे , राजकीय षडयंत्र आहे , फसवा फसवी आहे अशी विधाने अशिक्षित , सुशिक्षित वर्गाच्या तोंडून निघाली आणि कोरोना वाढीस बळकटी मिळत गेली , ही दुर्दैवाने खेदजनक बाब ठरली .आजचं हे वेदनादायी चित्र कोणतं ? कशाचं प्रतिक ? ही माणसं कशाने सोडून जाताहेत ? माणसं भयभीत झाली आहेत . दिवसांतून अनेकदा कोरोना झाल्याचा भास होतो आहे . जे या महामारीचं दुःख भोगताहेत त्यांच्या वेदनेला अंत नाही . good morning , good night या शब्दाऐवजी भावपूर्ण श्रद्धांजली हा शब्द परवलीचा झाला आहे .रडायचं तरी किती ? दुःख सहन करायचं तरी कसं ? रडू थांबतं नं थांबतं तोपर्यंत दुसरी घटना कानी धडकते आहे . किती सहन करायचं ? किती सोसायचं ? किती बोथट झाल्या आमच्या संवेदना ? आम्ही दुःखही क्षणात विसरायला लागलो .समग्र मानवजात कठीण काळातून जात आहे .आतातरी आम्ही सावध व्हायला हवं . ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत . प्रशासनाला सहकार्य करायला हवं .काळजी घ्यायला हवी . मन खंबीर करायला हवं . सर्दी , ताप , खोकला असेल तर भीतीपोटी अंगावर न काढता तात्काळ तपासणी करून घ्यायला हवी . काळ कठीण आहे . परंतु धैर्याने सामोरे जायला हवं . एकमेकांना धीर द्यायला हवा .अडचणीत असणाऱ्या मदत करायला हवी .नक्कीच हे वाईट दिवस राहणार नाहीत .यापूर्वीही अनेक संकटाना आपण सामोरे गेलोच आहोत .त्यातून बाहेर पडून आपण पूर्वपदावर आलोच होतो .याही कठीण परिस्थितीतून आपण बाहेर पडणारच आहोत .आपण थोडं मनाने खंबीर होऊ .
माणसाच्या मनातील भीती दूर करू . कोरोना हा सर्दी,ताप,खोकला,यावरील आजार आहे . तात्काळ वैद्यकीय सुविधा प्राप्त केल्या की तो बरा होतो . हा विचार जनमानसात पेरणं ,रुजवणं गरजेचं आहे.
दोन गोष्टी सर्वत्र चर्चेत असलेल्या आपणासमोर ठेवतो . हरीण आणि वाघ याचा विचार करू . हरीण वाघापेक्षा कित्येक पटीने वाघापेक्षा दौड मारण्यात पटाईत .परंतु वाघ आपल्याला खाऊन टाकेल या मनातील भीतीने हरणाची धावण्याची प्रक्रिया मंदावते . तसंच मांणसाचंही मन आहे . मला कोरोना झाला की माझं काही खरं नाही . ही मनातील अनामिक भीती माणसाला मारून टाकते . परंतु कोरोनापेक्षा महाभयंकर आजार आहेत , त्यावर आपण विजय मिळवलेला आहेचं . यावरही आपण विजय मिळवू शकतो .सत्तर - ऐशी वर्षाची माणसं कोरोनावर मात करताहेत .याही गोष्टी आपणाला विचारात घ्याव्या लागतील .हरून कसं चालेल ? दुसरी गोष्ट अमेरिकेतील एका कैद्याची . एका कैद्याला फाशीची शिक्षा झालेली असते.परंतु त्याला असं सांगितलं जातं की तुला फाशी ऐवजी विषारी कोब्रा नागाचा दंश करून मारलं जाणार .फाशीच्या दिवशी त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते .त्याला खुर्चीला बांधलं जातं . त्याला विषारी सापाऐवजी पिन टोचवण्यात येते . त्याच्या मनातील भीतीने व्हेनम सदृश्य विष त्याच्या शरीरात तयार झालं . त्या कैद्याचा काही वेळातच मृत्यू होतो . हे कशामुळे ? तर मनातील भीतीमुळे . जेवढं आपलं मन खंबीर तेवढा धोका कमी . त्यामुळे आजच्या परिस्थितीत नकारात्मक विचार सोडून देणं गरजेचं आहे . वाचन लिखाण , आहार , आवडी निवडी , व्यायाम यावर लक्ष देणे गरजेचे आहे .कोणतीही वेळ कायमस्वरूपी घर करून राहत नाही .उद्याचा उज्ज्वल आशावाद कायम ठेऊ .अनेकांना नोकरी गमवावी लागलेली आहे . घर चालवणं कठीण झालंय .कर्जबाजारीपणा वाढत चाललाय .बँकेची थकबाकी वाढत आहे . अनेक उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत . मानसिक अस्वस्थता वाढलेली आहे . नोकरीची चिंता सतावत आहे . तरीही हेही दिवस निघून जातील या भूमिकेतून धैर्याने सामोरे जावू . मानसिक खंबीरता या काळात खूप महत्त्वाची ,ती सर्वजण वाढवू .आज या बिकट प्रसंगी डॉक्टर,पोलीस,नर्स,राजकीय व्यक्ती,समाजसेवक,दानशूर व्यक्ती,सेवाभावी संस्था अडचणीच्या काळात पुढे सरसावल्या आहेत,त्यांना सहकार्य करू. एकमेकांना आधार देऊ . आपल्या सर्वांना निर्धाराने , एकजुटीने सर्व कोरोना नियमांचे पालन करून ही कोरोना महामारीची लढाई परतून लावायची आहे , ती जिंकायची आहे ,जिंकावीच लागणार आहे . बिघडलेलं सामाजिक पर्यावरण पूर्वपदावर आणण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू.

              ------प्रा.डॉ.तुळशीराम उकिरडे
             सहायक प्राध्यापक,मराठी विभाग
             तेरणा महाविद्यालय, उस्मानाबाद
             मोबाईल क्र.9881103941
 
Top