Views*सोयाबीनचे घरगुती बियाणे उगवणशक्ती तपासून पेरणीसाठी वापरावे - खा.राजेनिंबाळकर*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 येत्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी असलेले व पावसात न भिजलेले सोयाबीनचे बियाणे उगवणशक्ती तपासूनच पेरणीसाठी वापरावे असे आवाहन खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले. लोहारा तहसील कार्यालयामध्ये खा.राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व आ.ज्ञानराज चौगुले यांच्या उपस्थितीमध्ये दि.23 एप्रिल रोजी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी जिप सदस्य दीपक जवळगे, शेखर पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मोहन पणुरे, उमरगा उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसिलदार संतोष रुईकर, नायब तहसीलदार शिराळकर, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, गट विकास अधिकारी ए.के.अकेले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक कटारे, पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण, मुख्याधिकारी गजानन शिंदे, आदी उपस्थित होते. पुढे बोलताना खा.राजेनिंबाळकर म्हणाले की, सद्यस्थितीमध्ये सोयाबीनचे भाव वाढलेले असले तरी त्या प्रमाणात पुढे बियाणांचे भाव हे वाढणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी सर्व बियाणे विक्री न करता घरी पेरणीसाठी मुबलक प्रमाणात शिल्लक ठेवावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच वाढत असलेला कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करण्यासह लोहारा शहर व ग्रामीण रुग्णालय लोहारा येथील ऑक्सिजन बेड कोरोना रुग्णासाठी राखीव करुन कोरोना रुग्णांची अडचण दुर करण्याची मागणी केली. तर गरज भासल्यास कोविड केअर सेंटरसाठी नियोजन करण्यासाठी युवासेना शिवसेनेतर्फे स्वयंसेवक देण्याचे सांगितले. यावेळी आ.ज्ञानराज चौगुले म्हणाले की, बियाणामध्ये बचत करणे व उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करून पेरणीसाठी रुंद सरी, वरंबा (बीबीएफ) पद्धतीने पेरणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. तर तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी आजपर्यंत तालुक्यातील 18 गावांमध्ये बियाणे उगवणशक्तीची प्रात्यक्षिके कोरोना नियमांचे पालन करुन करण्यात आली असल्याचे सांगितले. यावेळी माजी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर सुर्यवंशी, शिवसेना शहरप्रमुख सलिम शेख, युवासेना उपजिल्हाप्रमुख नामदेव लोभे, गटनेते तथा नगरसेवक अभिमान खराडे, नगरसेवक शाम नारायणकर आदीसह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित शारीरिक अंतर ठेवून उपस्थित होते.
 
Top