Views


*विद्युत डीपीची उभारणी; शेतकऱ्याची मिरची भरली!
एक शेतकरी एक ट्रान्सफार्मर योजना; शेतकरी साठे यांना मिळवून दिला स्वतंत्र ट्रान्सफार्मर!
उच्च दाबाने, अखंडपणे विजपुरवठा; हिरव्यागार रोपांना मिरच्या लकडल्या! ग्रामपंचायत सदस्य बाकले यांच्या पाठपुराव्यातून ट्रान्सफार्मरची उभारणी!
एकट्या सारोळ्यात तब्बल १८ डीपीची झाली आहे उभारणी!*

उस्मानाबाद/प्रतिनिधी 

शेतकऱ्यांसाठी विद्युत ट्रान्सफार्मर (डीपी) हा तसा किचकट, कटकटीचा आणि त्रासदायक विषय. विद्युत ट्रान्सफार्मर जळणे, वारंवार बिघाड होणे, कमी दबाने शेतीला होणारा विजपुरवठा ही समस्या कायमचीच. हीच बाब ओळखून सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी महावितरणकडे वारंवार पाठपुरावा केला. तसेच शासनाच्या 'एक शेतकरी एक ट्रान्सफार्मर' योजनेतून एकट्या सारोळ्यात तब्बल १८ शेतकऱ्यांना स्वतंत्र डीपी मंजूर करून घेतले. सध्या हे सर्व डीपी सुरू झाले आहेत. त्यापैकी एक शेतकरी असलेले सुभाष साठे यांच्या शेतातही डीपी उभारण्यात आला असून अखंडपणे आणि उच्च दाबाने विजपुरवठा सुरू आहे. त्यामुळे साठे यांनी आपल्या दीड एकरमध्ये मिरचीची लागवड केली असून रोपाना आता मिरच्याही लकडल्या आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बुद्रूक) शिवारात उस्मानाबाद - औसा महामार्गालगतच शेतकरी सुभाष साठे यांची शेती आहे. साठे हे शेतात पारंपारिक पीके घेत होते. त्यातच त्यांना वैयक्तिक डीपी नसल्याने अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. वारंवार डीपीतील फ्यूज जाणे, कमी दाबाने पुरवठा, डीपी जळणे, बिघडण्यासह अनेक समस्या येत होत्या. साठे यांच्यासह गावातील बहुतांशी शेतकऱ्यांना याच त्रासातून जावे लागते. हीच बाब ओळखून सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी गावातील ज्या शेतकऱ्यांनी विद्युत डिमांडसाठी पैसे भरूनही पोल उभारणी व कनेक्शन मिळाले नाही, अशा १८ शेतकऱ्यांसाठी महावितरणकडे पाठपुरावा सुरू केला. तसेच यातील सर्वच शेतकऱ्यांची नावे महावितरणच्या 'एक शेतकरी एक ट्रान्सफार्मर' योजनेत मंजूर झाली. त्यानंतर संबंधिन ठेकेदार कंपनीकडे पाठपुरावा करून कामे लवकर सुरू करण्यासह ती दर्जेदार करण्यासाठी प्रयत्न केले. अवघ्या काही महिन्यात १८ शेतकऱ्यांना स्पशेल (स्वतंत्र) डीपी त्यांच्या शेतात उभारले. त्यामुळे त्यांची विजपुरवठ्याची कायमची समस्या सोडविण्यात श्री. बाकले यांना यश मिळाले आहे. यातील एक शेतकरी सुभाष साठे यांच्या शेतातही डीपीची उभारणी झाली आहे. साठे यांनी आपल्या दीड एकर क्षेत्रात मिरचीची लागवड केली आहे. सध्या मिरची बहरात आली असून मिरच्या लकडल्या आहेत. या मिरची प्लॅटची ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी साठे यांनी 'तुम्ही खूप पाठपुराव्यातून डीपी उभारली, आमची विजेची समस्या कायमची मिटवलीत' असे सांगून समाधान व्यक्त केले. यावेळी शेतकरी कालिदास मसे, नामदेव खरे, उपस्थित होते.


 
Top