Views


*पीक विम्याबाबत विमा कंपनी दोन दिवसात निर्णय घेणार 
-आ.राणाजगजितसिंह पाटील*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी पीक विम्याच्या माध्यमातून सर्व सहभागी शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री व कृषी आयुक्त यांच्याकडे केली आहे. अर्ज न केलेल्या तसेच उशिराने अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात आलेला नाही. या अनुषंगाने दि. ०६ जानेवारी, २०२१ रोजी कृषी आयुक्त व बजाज अलियान्झ जनरल विमा कंपनी लिमिटेडचे राज्य प्रमुख (कृषि व्यवसाय) श्री. रजत धर यांची बैठक झाली आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता उशिराने अर्ज केलेल्या व अर्ज न केलेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून दोन दिवसामध्ये निर्णय घेऊ असे बजाज अलियान्झ जनरल विमा कंपनी लिमिटेडचे राज्य प्रमुख (कृषि व्यवसाय) रजत धर यांनी बैठकीमध्ये आश्वासित केले आहे. पुढील दोन-तीन दिवसात विमा कंपनीची भुमिका स्पष्ट होणार असून त्यानंतर या महत्वपुर्ण व संवेदनशील विषयाबाबत पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले आहे. माहे सप्टेंबर व ऑक्टोबर २०२० मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीचे अध्यक्ष - जिल्हाधिकारी तसेच सदस्य सचिव या नात्याने जिल्हा अधिकारी कृषी अधिकारी यांनी कृषी आयुक्तालयास दि.२७.१०.२०२० रोजी पत्र पाठविले होते. त्यात "पिक विमा योजनेत काढणी पश्चात नुकसानीमध्ये गंजी स्वरूपात साठवून ठेवलेल्या पिकांचे नुकसान गृहीत धरणेबाबत." विचार होण्यासाठी मुद्दा उपस्थित केला होता. त्याबाबत कृषी आयुक्तालयाने तसेच सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आ.पाटील यांनी उपस्थित केली आहे. या विषयाबाबत अनेक शेतकरी संभ्रमात असून नुकसान भरपाई मिळेल का नाही याबाबत चिंतेत आहेत. शेतकऱ्यांनी काळजी करू नये, प्रधानमंत्री कृषी विमा योजनेत सहभागी सर्व बाधीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील प्रसंगी शेतकऱ्यांच्या साथीने तीव्र लढा उभारण्याचा इशारा आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी दिला आहे.
 
Top