Views


 *अतिवृष्टीने शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत -- पालकमंत्री शंकरराव गडाख*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

उस्मानाबाद जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात मागील तीन-चार दिवसात जवळपास दोनशे मिलिमीटर इतका पाऊस झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरिपाचा घास अतिवृष्टीने हिरावला गेला आहे.तरी राज्य शासनाच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने व पीक विमा कंपनीकडून मिळणाऱ्या मदतीसाठी बजाज ऑलिंझ या विमा कंपनीने पुढील आठ दिवसात अतिवृष्टीने पिकांच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी दिले. लोहारा तालुक्यातील राजेगाव बॅरेज परिसरात पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी दि.17 ऑक्टोबर 2020 रोजी अतिवृष्टीने व पुरामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. त्याप्रसंगी येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार कैलास घाडगे पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेशकुमार स्वामी, उमरगा उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे, बजाज अलायन्स विमा कंपनीचे समन्वयक देविदास कोळी, तहसीलदार डॉ.रोहन काळे, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणा चे विभाग प्रमुख तालुकास्तरीय अधिकारी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. पालकमंत्री गडाख पुढे म्हणाले की, उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. राज्यशासन आपत्तीच्या परिस्थितीमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून शेतकऱ्यांनी धीर धरावा त्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल. जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टीत सर्वाधिक नुकसान झालेल्या 70 गावांचे प्राथमिक यादी तयार केली आहे त्या सर्व गावातील पंचनामे प्रशासनाने नजर अंदाज पाहणी ने एका दिवसात पूर्ण करून घ्यावेत असे निर्देश त्यांनी दिले. तसेच पिक विमा कंपनीने अतिवृष्टीने झालेल्या जिल्ह्याच्या सर्व गावातील शेतकऱ्यांचे पंचनामे पुढील आठ दिवसात पूर्ण करून त्याचा प्रस्ताव सादर करावा व शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावा. एक ही  शेतकरी पंचनामे करण्यापासून वंचित राहिला नाही पाहिजे याची खबरदारी विमा कंपनीने घ्यावी. तसेच ज्या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने तक्रार करता येत नाही त्या ठिकाणी संबंधित कृषी सहायकाकडून ऑफलाईन अर्ज विमा कंपनीने स्वीकारावेत असे निर्देश पालकमंत्री गडाख यांनी दिले. यावेळी पालकमंत्री गडाख यांनी येणेगुर, माडज पाटी ता. तुळजापूर, कवठा तालुका उमरगा, राजेगाव बॅरेज तालुका लोहारा व अप्सिंगा तालुका तुळजापूर या या गावातील शेती पिकांचे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. व येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच शासनाकडून शक्य तेवढी मदत करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे शासनाने कोल्हापूर जिल्ह्याच्या धरतीवर उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अशी मागणी केली. तर आमदार चौगुले यांनी शेतकऱ्यांना ऑनलाइन द्वारे तक्रारी करण्यास खूप अडचणी येत असून शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत च्या तक्रारी ऑफलाइन स्वीकारल्या गेल्या पाहिजेत असे सांगितले. तर आमदार घाडगे पाटील यांनी अतिवृष्टीने कोणत्याही गावात वीज नसल्याने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगून शेतकऱ्यांचे ऑफ लाईन अर्ज स्वीकारून सरसकट मदत देण्याची मागणी केली. प्रारंभी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मागील तीन-चार दिवसात उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरी 163 मिलिमीटर पाऊस झाल्याचे सांगून उमरगा तालुक्यात मागील पाच दिवसात 235 मिलिमीटर तर लोहारा तालुक्यात दोनशे तुळजापूर तालुक्यात 212 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती दिली जिल्ह्यातील 42 महसूल मंडळापैकी 15 महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली असून उर्वरित महसूल मंडळात पूर परिस्थितीमुळे पिके वाहून गेल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील 203 बंधारा पैकी 140 बंधारे ओव्हर फ्लो झालेले होते. या दृष्टी मुळे जिल्ह्यातील 118 जनावरे वाहून गेले असून 53 घरांची पडझड झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे तसेच जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या विविध ठिकाणी अतिवृष्टी व पुरामुळे अडकलेल्या 126 नागरिकांना सुखरूप बाहेर काढल्याची माहिती जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी देऊन यापूर्वीच प्रशासनाला व विमा कंपनीला शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
 
Top