Views


*माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत उस्मानाबाद जिल्हा आघाडीवर-पालकमंत्री शंकरराव गडाख*

*या मोहिमेसाठी 1097 आरोग्य पथके व 3194 कर्मचाऱ्यांची नियुक्ती*

*उस्मानाबाद:-(सैफोद्दीन काझी)*

उस्मानाबाद,(दि.4)जिल्ह्यात `माझे कुटुंब माझी जबाबदारी` या मोहिमेत  आतापर्यंत 2 लाख 62 हजार 820 कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून या मोहीमेस नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. व या मोहिमेला असाच प्रतिसाद जिल्ह्यातील नागरिकांनी देऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी व
जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. म्हणजे जिल्हा कोविड मुक्त होण्यास मदत होईल, असे आवाहन 
राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी केले आहे.
    महाराष्ट्र राज्य कोविड मुक्त करण्यासाठी  माननीय मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्याच्या शहरी व ग्रामीण भागात "माझे कुटुंब माझे जबाबदारी" ही मोहीम राबवून प्रत्येक कुटुंब व कुटुंबातील प्रत्येक सदस्याची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात कोरूना चा संसर्ग रोखण्यासाठी 1 हजार 97 आरोग्य पथकाची निर्मिती करण्यात आलेली असून यासाठी 3 हजार 194 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे असे पालकमंत्री गडाख यांनी सांगितले.
    जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा फैलाव रोखणे आणि मृत्यूदराचे प्रमाण कमी करणे यासाठी राज्य शासन योग्य प्रकारे खबरदारी घेत आहे. त्यासाठी संपूर्ण राज्यात  `माझे कुटुंब माझी जबाबदारी` ही मोहिम सुरू केली आहे. यामध्ये प्रत्येक कुटुंबांच्या घरी जावून त्यांची तपासणी केली जात आहे. एखादी व्यक्ती कोणत्याही आजाराने ग्रासली असेल तर त्याची नोंद घेतली जाते. ऑक्सीमीटरने ऑक्सीजन
लेव्हल तपासणी करण्यात येते.तसेच ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी अशी लक्षणे असतील तर त्यांची नोंद घेऊन तपासणी केली जाते. या तपासणीमध्ये संशयीत आढळून आल्यानंतर अँटीजन चाचणी घेऊन उपचार करणे. अन्य आजारावरील रुग्णांना इतरत्र हलविणे. त्यांच्यावर वेळेत औषधोपचार करणे आदी उपाय योजना केल्या जात आहेत, अशी माहिती श्री गडाख यांनी दिली.
     जिल्ह्यात एकूण 3 लाख 43 हजार 949 कुटुंबे असून त्यामध्ये 16 लाख 80 हजार 593  नागरिक राहतात. या सर्वच कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याची मोहिम प्रशासनाने हाती घेतली आहे. यामध्ये सुमारे 171 डॉक्टर्स 48 अँबुलन्स सहभागी झालेल्या आहेत. जिल्ह्यातील अडीच लाखापेक्षा जास्तीच्या कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 2 हजार 765 रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये 122 सारीचे, कोव्हिडचे 710, इलीचे 880 तर अन्य आजाराचे 1053 रुग्ण आहेत. शहरी भागात 70 हजार 878 कुटुंब संख्या आहे. यापैकी 12 हजार 928 कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तर ग्रामीण भागात दोन लाख 74 हजार 951 कुटुंब आहेत. यापैकी दोन लाख 25 हजार 529 कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. शहरी भागामध्ये आठ नगरपालिका आणि दोन नगरपंचायतीचा समावेश आहे. तर ग्रामीण भागात सर्वच ग्रामपंचायती आहेत. ग्रामीण भागातील सर्वेक्षण 80 टक्केपेक्षा जास्त झाले असून शहरी भागातील वेग वाढविण्याची गरज आहे. शहरी
भागात 102 पथके असून 302 कर्मचारी आहेत. ही संख्या वाढविण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. ग्रामीण भागात 995 पथके असून 2892 कर्मचारी
आहेत. याशिवाय 157 डॉक्टर्स सोबतीला आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात सर्वेक्षण वेगात होत असल्याची माहिती पालकमंत्री गडाख यांनी दिली. 
     काही ठिकाणी नागरिक सहकार्य करीत नसल्याचे कर्मचारी वर्गातून समजले आहे. मात्र कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वच नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. त्यासाठी कोणताही अहंभाव, न्यनगंड, भिती मनामध्ये न बाळगता नागरिकांनी पुढे येऊन शासनाच्या या मोहिमेला सहकार्य करावे, असे अवाहन पालकमंत्री गडाख यांनी केले आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासन स्तरावर विविध प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री गडाख यांनी केले आहे.
 
Top